-आठवडी बाजार तलावातील पाण्याचा मार्ग मोकळा होणार; नागरिकांच्या पाठपुराव्याला यश
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील आठवडी बाजार तलावात पाणी पोहोचण्यासाठी असलेला मार्ग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने होत होती. अखेर या कामास मंजुरी मिळाली असून संबंधित पुलाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे.
साखरखेर्डा येथील ऐतिहासिक मोठ्या मशिदीच्या पश्चिमेला असलेल्या तलावात परिसरातील सुमारे तीन किलोमीटर शेतशिवारातून पाणी येत होते. मात्र कालांतराने या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाल्याने नैसर्गिक नाल्यांचे अस्तित्व धोक्यात आले. अनेक ठिकाणी पाण्याचे मार्ग बदलल्याने तलावात पाणी येणे बंद झाले होते. माजी सरपंच दाऊद कुरेशी यांनी २०२२-२३ दरम्यान पिंपळगाव सोनारा फाटा ते बसस्थानक परिसरापर्यंत पाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी भुयारी नाल्याचे काम केले होते. विविध अडथळे दूर करण्यात आले तसेच तलावातील गाळही काढण्यात आला. मात्र बसस्थानकाजवळील मुख्य नाल्यावरील अडथळा कायम असल्याने तलावात पाणी पोहोचण्यात अडचणी येत होत्या. दुसरबीड ते अमडापूर हा २२२ क्रमांकाचा राज्य महामार्ग असून या मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामांत अनेक नवीन नाल्यांची उभारणी करण्यात येत असली तरी बसस्थानकाजवळील पुलाचा समावेश नव्हता. त्यामुळे या ठिकाणीही पुलाचे काम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित विभागाच्या मुख्य अभियंत्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून प्रस्तावास मंजुरी दिली. या कामासाठी अमित जाधव आणि भाजपचे प्रदेश सदस्य रावसाहेब देशपांडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ७ जून रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव आणि रावसाहेब देशपांडे यांच्या हस्ते पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाचे पाणी वस्तीमध्ये न शिरता थेट तलावाकडे वळविले जाईल, त्यामुळे आठवडी बाजार तलाव पुन्हा भरून जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. यावेळी अमित जाधव, सुनील जगताप, दाऊद कुरेशी, कमलाकर गवई, संतोष दसरे, सय्यद रफीक, बाबा तिवारी, कयुम मेंबर, इब्राहिम शहा, संग्रामसिंह राजपूत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.