पाथर्डीच्या महिलेच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा जिल्ह्यात चोऱ्या!
चिखली (अंकुश पाटील): गर्दीच्या ठिकाणी महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या एका सराईत महिला चोराला चिखली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (D.B. Cell) छत्रपती संभाजीनगर येथून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेकडून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुवर्णा काकासाहेब काळे (वय ४०, रा. पाथर्डी रोड शेवगाव, जि. अहमदनगर; सध्या मुक्काम. चंदनापुरी, ता. अंबड, जि. जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. या सराईत महिला चोराने छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा अशा विविध जिल्ह्यांत चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या वडिलांसह ११ मे रोजी जुने सोन्या-चांदीचे दागिने मोडून नवीन दागिने खरेदी करण्यासाठी चिखली येथे आल्या होत्या. त्यांनी सोन्याचे दोन डोरले, चार मणी आणि चांदीचे तीन जोडवे असा एकूण ३१ हजार ९५० रुपयांचा नवीन ऐवज खरेदी केला. हा ऐवज एका कापडी पिशवीत ठेवून ती पिशवी वायरच्या पिशवीत ठेवली होती.
दुपारच्या सुमारास फिर्यादी महिला चिखली येथील ‘मनीषा स्टील होम’मध्ये स्टीलचे ग्लास घेत असताना, एका ४० ते ४५ वयोगटातील अज्ञात महिलेने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पिशवीतून दागिन्यांची पिशवी अलगद लंपास केली. याप्रकरणी १४ मे रोजी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. ठाणेदार पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून डी.बी. पथकाला आरोपीच्या शोधासाठी रवाना केले होते.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की, सदर संशयित महिला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चंदनापुरी येथील आहे. त्यानुसार चिखली पोलिसांचे एक विशेष पथक जालना आणि छत्रपती संभाजीनगर भागात रवाना झाले. शोधमोहीम सुरू असतानाच, ही महिला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालय (Ghati Hospital) परिसरात वावरत असल्याची पक्की माहिती मिळाली. पथकाने तात्काळ घाटी हॉस्पिटल परिसरात सापळा रचला. तेथे संशयास्पदरित्या फिरत असताना सुवर्णा काळे हिची हालचाल पोलिसांना टिपता आली आणि महिला पोलिसांनी तिला शिताफीने ताब्यात घेतले. कारवाई करणारे पोलीस पथक: सदरची यशस्वी कारवाई बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलीचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाचे पोना अमोल गवई, मपोहेकॉ सूर्यकला म्हस्के, पोका प्रशांत धंदर, पोका अजय इटावा, पंढरीनाथ मिसाळ, राहुल पायघन आणि निलेश सावळे यांनी केली आहे.
सुरुवातीला उडवाउडवी, अंगझडतीत मुद्देमाल जप्त
ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला तिने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी महिला पंचांसमक्ष तिची कसून अंगझडती घेतली असता, तिच्याकडे चोरी गेलेले सोन्याचे २ डोरले, ४ मणी आणि चांदीचे ३ जोडवे असा पूर्ण मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत गुन्हा कबूल केल्यानंतर तिला चिखली पोलीस ठाण्यात आणून रीतसर अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक अमोल गवई करत आहेत.