-बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी शाखा व्यवस्थापक अरुण चेके यांचे निधन; साखरखेर्डा परिसरात हळहळ
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : लिंगा या छोट्याशा गावातून शिक्षण घेऊन प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि लोकाभिमुख कार्यशैलीच्या जोरावर सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी शाखा व्यवस्थापक अरुण बाबुराव चेके (वय ७०) यांचे सोमवार, १ जून रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने साखरखेर्डा परिसरासह सहकार, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
लिंगा गावात जन्मलेल्या अरुण चेके यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी शेंदुर्जन येथे जाऊन शिक्षण घेतले, तर उच्च शिक्षण खामगाव येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सेवेला सुरुवात केली. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी साखरखेर्डा शाखेचे व्यवस्थापक म्हणून उल्लेखनीय कार्य केले. शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत असताना शेतकरी कर्ज प्रकरणे, शिक्षकांचे वेतन, वैयक्तिक कर्जे आणि बँकेतील दैनंदिन व्यवहारांचा मोठा कारभार त्यांनी अत्यंत जबाबदारीने सांभाळला. त्यांच्या कार्यपद्धतीची विशेष बाब म्हणजे कोणत्याही ग्राहकाला रिकाम्या हाताने परत न पाठविण्याची वृत्ती. अनेक शिक्षक सायंकाळी उशिरा वेतनासाठी बँकेत येत असत, मात्र वेळेची पर्वा न करता त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी ते तत्पर असत. त्यामुळे साखरखेर्ड्यासह परिसरातील सुमारे ४० गावांमध्ये त्यांची विश्वासार्ह अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली होती. सहकार क्षेत्रासोबतच राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्येही त्यांचा सहभाग होता. सहकार महर्षी कै. भास्करराव शिंगणे यांच्या कार्यकाळात त्यांनी या भागातील जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या. तसेच माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीच्या काळातही ते निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून सक्रिय होते.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी साखरखेर्डा येथेच वास्तव्यास राहून सामाजिक संपर्क कायम ठेवला. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, चार बहिणी, एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचा मुलगा अक्षय चेके हा मंठा पंचायत समितीत अभियंता म्हणून कार्यरत असून मुलगी अर्चना मेहकर येथे वास्तव्यास आहे. अरुण चेके यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी ४ वाजता साखरखेर्डा येथील श्री रोकडोबा हनुमान मंदिरामागील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पत्रकार सुधीर चेके, समाधान बुंधे, निवृत्ती खरात, रमेश ठोसरे, अशोक पाटील, दामोदर लांबाडे, बबनराव लोढे, अशोक इंगळे, अनंत रिंढे, सुनील रिंढे, अमित जाधव यांच्यासह अक्षय चेके यांचा मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम गुरुवार, ४ जून रोजी सकाळी ९ वाजता साखरखेर्डा येथे होणार आहे. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.