-विशेष सुविधायुक्त वाहनांमुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन प्रवास होणार सुलभ
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना विशेष सुविधायुक्त तीनचाकी वाहने भेट देऊन महावितरणने त्यांच्या कार्यालयीन प्रवासातील मोठा अडथळा दूर केला आहे. त्यामुळे दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांच्याकडून महावितरण व ग्राहकांची अधिक उत्तम सेवा घडेल, असे प्रतिपादन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले.
महावितरणच्या अकोला परिमंडलांतर्गत बुलढाणा मंडलातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांतर्गत खामगाव येथे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते तीनचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके, कार्यकारी अभियंता विरेंद्र जसमतिया तसेच व्यवस्थापक (मा.सं.) योगेश्वर पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांनी महावितरणमध्ये दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले. अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके आणि कार्यकारी अभियंता विरेंद्र जसमतिया यांनी मनोगत व्यक्त करताना महावितरणकडून दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक योगेश्वर पाडवी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आशिष सराफ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खामगाव विभागीय कार्यालयातील सतीश कोल्हे, डुबल, पुरणेकर, प्रफुल्ल भातकुळकर, सुशांत देशमुख, गणेश आटोळे, हसन हवालदार, विलास हेलगे, स्वप्नील कुहाटे, नितीन वानखेडे आणि शेगोकार यांनी पुढाकार घेतला.