पंचायतराज समितीच्या मूल्यमापनात ८४ टक्के गुण; तीन वर्षांतील विकासकामांची दखल!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंचायतराज समितीने घेतलेल्या आढाव्यात सिंदखेडराजा तालुक्यातून वरोडी ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. समितीने केलेल्या मूल्यमापनात वरोडीच्या विकासकामांना ८४ टक्के गुण मिळाले आहेत. अभियानांतर्गत तालुक्यातील १० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. गेल्या महिन्यात पंचायतराज समितीने वरोडी गावाला भेट देऊन शासनाच्या विविध योजना आणि विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली होती.

वरोडीच्या सरपंच सौ. अन्नपूर्णा गारोळे यांनी गेल्या तीन वर्षांत शासकीय योजनांचा प्रभावी अभ्यास करून त्या गावात यशस्वीपणे राबवल्या. यामध्ये गावातील अंतर्गत रस्ते विकास आणि पेव्हर ब्लॉक बसवणे, सांडपाणी व्यवस्थापन आणि शुद्ध पाणीपुरवठा योजना, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, स्मशानभूमीची स्वच्छता, दुरुस्ती आणि स्थानिक मंदिरांचे सुशोभीकरण, आदी सर्वसमावेशक विकासकामांच्या जोरावर गावाने हा बहुमान मिळवला आहे. सरपंच सौ. अन्नपूर्णा गारोळे आणि ग्रामसेवक/सचिव सरला गावडे यांनी समन्वयातून केलेल्या या कामगिरीचे तालुक्यात कौतुक होत आहे.