विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक जाहीर; पुणे, अहिल्यानगर, सोलापूरसह राज्यात आचारसंहिता लागू!
पुणे (सोनल गडगुजर) : राज्यातील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. भारत निवडणूक आयोगाने आज (१८ मे २०२६) या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम घोषित केला असून, यामुळे पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांसह संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर स्थानिक पातळीवर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाच्या समन्वय अधिकारी ज्योती कदम यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस आयुक्तालय आणि सर्व संबंधित शासकीय विभागांना आचारसंहितेचे कडक पालन करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, या निवडणुकीची अधिकृत अधिसूचना २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल.
- अधिसूचना जारी करणे: २५ मे २०२६ (सोमवार)
- उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ०१ जून २०२६ (सोमवार)
- अर्जांची छाननी: ०२ जून २०२६ (मंगळवार)
- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: ०४ जून २०२६ (गुरुवार)
- मतदानाचा दिनांक: १८ जून २०२६ (गुरुवार, सकाळी ८:०० ते दुपारी ४:००)
- मतमोजणी आणि निकाल: २२ जून २०२६ (सोमवार)
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची मुदत: २५ जून २०२६ (गुरुवार)
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी तिथल्या किमान ७५% स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद इ.) कार्यरत असणे आणि किमान ७५% मतदार (लोकप्रतिनिधी) पदावर असणे बंधनकारक असते. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे हा तांत्रिक निकष पूर्ण होत नव्हता, परिणामी या १६ जागांची निवडणूक वेळेवर घेता आली नव्हती. आता महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (CEO) हे निकष सर्व १६ मतदारसंघांमध्ये पूर्ण झाल्याचा अहवाल दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर या निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे.
या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. संबंधित लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या:
- सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था : येथील तत्कालीन सदस्य प्रशांत प्रभाकर परिचारक हे १ जानेवारी २०२२ रोजीच निवृत्त झाले होते, तेव्हापासून ही जागा रिक्त होती.
- अहिल्यानगर (अहमदनगर) स्थानिक स्वराज्य संस्था : येथील तत्कालीन सदस्य स्व. अरुणकाका बाळभीमराव जगताप हे देखील १ जानेवारी २०२२ रोजी निवृत्त झाले होते. व त्यांचे निधनदेखील झाले आहे.
- पुणे स्थानिक स्वराज्य संस्था : पुण्याचे तत्कालीन सदस्य अनिल शिवाजीराव भोसले यांचा कार्यकाळ ५ डिसेंबर २०२२ रोजी संपला होता.
या तीन जागांशिवाय ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)-जालना या मतदारसंघांमध्येही ही निवडणूक पार पडणार आहे.
प्रशासनाची कडक पावले; २४ ते ७२ तासांत फलक हटवण्याचे आदेश
आचारसंहिता लागू होताच पुणे जिल्हा प्रशासनाने ‘मालमत्ता विरुपण प्रतिबंधक अधिनियम १९९५’ अंतर्गत तातडीने कडक कारवाई सुरू केली आहे. शासकीय इमारती, बस स्थानके, रेल्वे स्थानके, विमानतळ, उड्डाणपूल, रस्ते आणि वीज-टेलिफोनच्या खांबांवर लावलेले राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊट्स आणि झेंडे तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय बसेसवर असणाऱ्या राजकीय जाहिरातीही तातडीने काढण्याचे निर्देश आहेत. ही कारवाई करून प्रशासनाला २४, ४८ आणि ७२ तासांच्या आत केलेल्या कारवाईची सांख्यिकीय माहिती गुगल स्प्रेडशिटच्या माध्यमातून निवडणूक कक्षाला सादर करावी लागणार आहे. सर्व शासकीय, निमशासकीय आणि स्वायत्त संस्थांना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची लेखी दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्यांची नावे
- सोलापूर: प्रशांत प्रभाकर परिचारक
- अहिल्यानगर: अरुणकाका बालभीमराव जगताप
- ठाणे: फाटक रवींद्र सदानंद
- जळगाव: चंदूभाई व्ही. पटेल
- सांगली-कम-सातारा: कदम मोहनराव श्रीपती
- नांदेड: अमरनाथ अनंतराव राजूरकर
- यवतमाळ: दुष्यंत सतीश चतुर्वेदी
- पुणे: अनिल शिवाजीराव भोसले
- भंडारा-कम-गोंदिया: डॉ. परिणय रमेश फुके
- रायगड-कम-रत्नागिरी-कम-सिंधुदुर्ग: अनिकेत सुनील तटकरे
- नाशिक: नरेंद्र भिकाजी दराडे
- वर्धा-कम-चंद्रपूर-कम-गडचिरोली: रामदास भगवानजी आबिटकर
- अमरावती: प्रवीण रामचंद्र पोते
- उस्मानाबाद-कम-लातूर-कम-बीड: सुरेश धस
- परभणी-कम-हिंगोली: विप्लव गोपीकिसन बजोरिया
- छत्रपती संभाजीनगर-कम-जालना: अंबादास दानवे