– ज्येष्ठ शेतकरी नेते शेणफडराव घुबेंची सरनाईक यांना बैल देण्याची ‘ऑनलाईन ऑफर’; अटी वाचून ग्रामीण भागात एकच हशा!
– डिझेलसाठी ट्रॅक्टर सोडून बैल मागणाऱ्या शेतकरी नेत्याची ज्येष्ठ शेतकरी नेत्याकडून ‘सोशल कोंडी’!
चिखली (अंकुश पाटील) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर डिझेल टंचाईच्या मुद्द्यावरून ‘सरकारने शेतकऱ्यांना नांगरणीसाठी सहा बैल द्यावेत’, अशी अजब मागणी करणाऱ्या शेतकरी नेते विनायक सरनाईक यांना ज्येष्ठ शेतकरी नेते शेणफडराव घुबे यांनी आपल्या खास शैलीत जोरदार टोला लगावला आहे. सरनाईक यांच्या या मागणीची खोचक शब्दांत खिल्ली उडवताना घुबे यांनी त्यांना थेट बैल देण्याची ‘ऑफर’ दिली आहे, पण त्यासाठी घातलेल्या अटी वाचून सध्या शेतकरी वर्गात एकच हशा पिकला आहे.
डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टर बंद पडण्याच्या भीतीने शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी सरकारला ‘सहा बैल’ देण्याचा खोचक सल्ला दिला दिला होता. यावर प्रत्युत्तर देताना शेणफडराव घुबे यांनी सरनाईक यांच्या आंदोलनाची हवाच काढून घेतली.
घुबे यांनी सरनाईक यांना उद्देशून म्हटले आहे की, “विनायकराव, माझ्याकडे सहा बैल खुट्यावर बांधलेले आहेत. त्यांचे चारा-पाणी करायला आणि शेण काढायला कोणी तयार नाही. विकावे म्हटलं, तर कसाई कत्तलखान्यात नेऊन कापून टाकतील अशी भीती वाटते. त्यामुळे आपण दररोज चारा-पाणी आणि शेण काढण्याच्या अटीवर हे बैल घेऊन जाऊ शकता!”
मात्र, हे बैल मिळवण्यासाठी घुबे यांनी ज्या अटी घातल्या आहेत, त्या सध्याच्या सरकारी नोकरशाही आणि डिजिटल इंडियाच्या जाचक नियमांवर चपखल चपराक लगावणाऱ्या आहेत. बैल हवे असल्यास सरनाईक यांना खालील कागदपत्रांसह ‘फसवणूकराव फडतूसराव लफंगे@gmail.com’ या ईमेल आयडीवर ‘दिवस निघण्याच्या आत’ ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे:
- मंत्र्यांचे शिफारसपत्र: तुम्ही प्रामाणिकपणे बैलांचे चारा-पाणी करू शकता, याबाबत कोणत्याही केंद्रीय मंत्रालयातील मंत्र्याचे शिफारसपत्र जोडणे बंधनकारक आहे.
- बँक लिंक कागदपत्रे: आधारकार्ड बँकेशी लिंक असायला हवे आणि कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- प्रतिज्ञापत्र व सातबारा: दररोज चारा-पाणी करण्याबाबतचे ‘रजिस्ट्रर्ड प्रतिज्ञापत्र’ आणि आपण शेतकरी असल्याबाबतचे भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे प्रमाणपत्र, तसेच किमान ४५ एकर जमीन असल्याचा सातबारा हवा.
- चारित्र्य प्रमाणपत्र: अर्जदारावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसलेले (पोलीस चारित्र्य) प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- शेणखताचा ५०% वाटा: वर्षभरात निघणाऱ्या शेणखतापैकी ५० टक्के शेणखत मूळ मालकाला (घुबे यांना) देण्यास तयार असल्याबाबतचे हमीपत्र देणे गरजेचे आहे.
“मुदत संपल्यानंतर आपली कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही,” असा सज्जड दमही घुबे यांनी दिला आहे. त्यामुळे आता डिझेलच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडणारे सरनाईक, घुबे यांनी मागितलेली ही ‘केंद्रीय मंत्र्यांची शिफारस’ आणि ‘४५ एकरांचा सातबारा’ आणून बैल घरी नेणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे, खरीप हंगाम तोंडावर असताना पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ट्रॅक्टर पंपावर नेण्यात वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात असल्याने शेतीची मशागत खोळंबली आहे. “सरकारला हा अपव्यय दिसत नाही का?” असा सवाल करत शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र सध्या डिझेलच्या टंचाईपेक्षा घुबे यांनी सरनाईक यांना सुनावलेल्या ‘बैल अटींची’च चर्चा ग्रामीण भागात जोरदार रंगली आहे.
—-
“सरनाईक यांच्या मागणीला माझे पूर्ण समर्थन; माझ्या विडंबनाचा चुकीचा अर्थ काढू नये” – शेनफडराव घुबे
शेतकऱ्याला सहा बैल देण्याची मागणी करून विनायकराव सरनाईक यांनी शेतकऱ्यांची खरी व्यथाच सरकारसमोर मांडली आहे. आज शेतीकामाच्या ऐन हंगामात डिझेलसाठी शेतकऱ्याची जी ससेहोलपट होते, ती अत्यंत वेदनादायी आहे. सरकार प्रत्येक योजनेत जाचक अटी लादून शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे, याच धोरणावर मी उपरोधिक आणि विनोदी भाषेत बोट ठेवले होते. माझ्या या पोस्टचा अर्थ ‘मी सरनाईक यांची कोंडी केली’ असा काढणे अत्यंत चुकीचे आहे. या साध्या विषयाचा विनाकारण पराचा कावळा केला आहे. माझी ती पोस्ट केवळ सरकारच्या किचकट कारभारावर केलेले एक विडंबन होते, त्यामुळे सर्वांनी या बाबीची केवळ एक ‘विनोद’ म्हणून नोंद घ्यावी, ही विनंती.”
— शेनफडराव घुबे, ज्येष्ठ शेतकरी नेते