– हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण; इंदापूरच्या जागेवरून ‘मशाल’ की ‘तुतारी’?
– अजित पवार गटातील नाराजीनाट्यानंतर शरद पवार गटाच्या हालचाली वाढल्या!
पुणे (सोनल बडगुजर) : राज्यातील बदलत्या राजकीय वातावरणात आणि महायुतीमधील जागावाटपाच्या पेचप्रसंगात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांची पुण्यातील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी अत्यंत गोपनीय बैठक पार पडली. या बैठकीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह भाजपशी जवळीक असलेले नेते हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. या ‘गुप्त’ बैठकीमुळे पश्चिम महाराष्ट्राच्या, विशेषतः पुण्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीचे नियोजन अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, अजित पवार गटातील सुनील तटकरे यांनी नुकतीच शरद पवार यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर पवारांनी प्रफुल्ल पटेल व तटकरे यांच्या अनुभवाचा वापर करून घेण्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिलेला सल्ला, या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ‘घरवापसी’चे संकेत आणि आगामी निवडणुकांसाठीची रणनीती यावर या बैठकीत खल झाल्याचे समजते.
इंदापूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. अशा परिस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या विश्वासू नेत्यांसोबत खलबते केल्याने ते पुन्हा मूळ राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) वाटेवर आहेत का? अशा चर्चांनी जोर धरला आहे. अनिल देशमुख आणि अमोल कोल्हे यांसारख्या आक्रमक नेत्यांशी झालेली ही चर्चा केवळ औपचारिक नसून, आगामी काळात होणाऱ्या राजकीय स्फोटाची नांदी असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील संभाव्य अस्वस्थता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संधीचा फायदा शरद पवार गटाने कसा करून घ्यावा, यावर बैठकीत प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी पुण्यातूनच हलते, याचा प्रत्यय या बैठकीतून पुन्हा एकदा आला आहे. या बैठकीचा अधिकृत तपशील पक्षाने अद्याप उघड केला नसला तरी, येत्या काही दिवसांत शरद पवार गटाची भूमिका यावर अधिक प्रकाश टाकेल.