नवी मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या महसूल विभागात ‘डिजिटल ७/१२’ प्रणाली राबवण्यात कळीची भूमिका बजावणारे आणि या प्रणालीचे ‘जनक’ म्हणून ओळखले जाणारे नवी मुंबईचे अपर जिल्हाधिकारी रामदास हरिभाऊ जगताप (५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. सिडकोच्या साडेबावीस टक्के योजनेतील जमिनीच्या करारासाठी २२ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. जगताप यांच्यासोबतच त्यांचा शिपाई हरेश सोनवणे यालाही ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील सिडको (CIDCO) कार्यालयात भूमी व भूमापन अधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या रामदास जगताप यांनी एका तक्रारदाराकडे जमिनीच्या कराराच्या (Agreement) बदल्यात लाचेची मागणी केली होती. सिडकोच्या साडेबावीस टक्के योजनेअंतर्गत जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही रक्कम मागण्यात आली होती.
तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली. एसीबीच्या पथकाने बुधवारी (१३ मे) सिडको कार्यालयात सापळा रचला. जगताप यांच्या सांगण्यावरून शिपाई हरेश सोनवणे याने २२ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले.
रामदास जगताप हे महसूल विभागातील एक अनुभवी आणि अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखले जातात. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ‘जांबुत’ हे त्यांचे मूळ गाव आहे. विशेषतः राज्यातील ७/१२ उतारा डिजिटल करण्याच्या प्रक्रियेत त्यांचे मोठे योगदान मानले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ही प्रणाली यशस्वीपणे राबवली गेली होती. मात्र, आता एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना अटक झाल्याने त्यांच्या कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“तक्रारदाराच्या कामासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. पडताळणीअंती सिडको कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपी रामदास जगताप आणि त्यांचा शिपाई यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.” — नवी मुंबई एसीबी पथक
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कारवाईनंतर जगताप यांच्या मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला अशा प्रकारे अटक झाल्याने सिडको आणि महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.