-निवडणूक आयोगाकडे तातडीने सुधारणा करण्याची विठ्ठल घायाळ यांची मागणी
दाभा (वाजिद खान) : नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे हजारो युवक-युवती मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या Voter Helpline आणि ECINET या ऑनलाइन ॲपमध्ये जन्मतारखेच्या मर्यादेमुळे अनेक पात्र युवकांची नोंदणी होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
निवडणूक आयोगाने गावपातळीवर जिल्हा परिषद शिक्षकांची बीएलओ (BLO) म्हणून नियुक्ती केली असून मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती आणि पडताळणीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज केल्यानंतर संबंधित बीएलओमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जातात. मात्र सध्या ऑनलाइन प्रणालीमध्ये केवळ १ ऑक्टोबर २००६ पूर्वी जन्मलेल्या नागरिकांचीच नोंदणी स्वीकारली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे २००७ आणि २००८ मध्ये जन्मलेल्या तसेच १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींचे अर्ज स्वीकारले जात नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक युवकांनी ऑनलाइन नोंदणीचा प्रयत्न करूनही अर्ज प्रक्रिया पुढे सरकत नसल्याची माहिती समोर येत आहे.
या तांत्रिक अडचणीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह नवमतदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकांपूर्वी हजारो पात्र युवक मतदान प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विठ्ठल घायाळ यांनी भारतीय निवडणूक आयोगाने या समस्येची तातडीने दखल घेऊन संबंधित ॲपमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा कराव्यात, अशी मागणी केली आहे. “१८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक युवक-युवतीला मतदानाचा अधिकार मिळणे ही लोकशाहीची गरज आहे. त्यामुळे पात्र नागरिकांची नोंदणी तत्काळ स्वीकारली जाईल, अशी व्यवस्था करण्यात यावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.