-‘बुवा तिथे बाया’ विषयावरील व्याख्यानात अंधश्रद्धा व बुवाबाजीवर जोरदार टीका
वर्धा (प्रकाश कथले) : सरकारला राज्यातील जनता अंधश्रद्धेतच गुरफटून ठेवायची आहे. त्यासाठी बाहेरच्या राज्यातील बाबा आयात केले जातात. फडणवीस सरकारने महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार आणि प्रसार काटेकोरपणे केला असता, तर अशोक खरातसारख्या प्रवृत्ती निर्माण झाल्या नसत्या, असा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी ‘बुवा तिथे बाया’ या विषयावरील जाहीर व्याख्यानात केला.
स्थानिक लोक महाविद्यालयाच्या प्रांगणात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विविध पुरोगामी सामाजिक संघटनांच्या वतीने बुवाबाजीविरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचे उद्घाटन खासदार अमर काळे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थिनींना कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक देऊन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. चेतना सवाई होत्या. यावेळी नगराध्यक्ष डॉ. सुधीर पांगूळ, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, अंनिसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, राज्य सचिव प्रशांत सपाटे, जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, जिल्हा संघटक पंकज वंजारे तसेच महिला शाखेच्या जिल्हा संघटक डॉ. सुचिता ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या व्याख्यानात प्रा. श्याम मानव यांनी सर्व धर्मांमध्ये चालणाऱ्या बुवाबाजीवर कठोर टीका केली. विविध पंथ आणि संप्रदायांतील बुवाबाबांकडून होणाऱ्या स्त्रियांच्या लैंगिक, मानसिक आणि आर्थिक शोषणाकडे लक्ष वेधत त्यांनी अंनिसने यापूर्वी उघड केलेल्या अनेक प्रकरणांचा उल्लेख केला. स्वामी विद्यानंद, व्यंकटनाथ, कृपालू महाराज, सुंदरदास बाबा, शेळके बाबा, आसाराम बापू, नारायण साई यांसारख्या बाबांची प्रकरणे उदाहरण म्हणून देत ज्योतिषाचा व्यवसाय करणारे अनेकजण ढोंगी असून समाजाचे शोषण करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. धार्मिक कर्मकांडाच्या नावाखाली समाजात कोणत्याही प्रकारचे शोषण होऊ नये, यासाठी फडणवीस यांनी जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रशिक्षण आणि अंमलबजावणीवर भर द्यावा, तसेच जाणते मुख्यमंत्री म्हणून इतिहासावर आपली छाप सोडावी, असे आवाहनही प्रा. श्याम मानव यांनी केले.
प्रारंभी खासदार अमर काळे यांनी वर्तमानातील बुवाबाजी आणि सरकारच्या अवैज्ञानिक धोरणांवर टीका करत विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिप्रामाण्यवादी पिढी निर्माण होण्याची गरज व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात डॉ. चेतना सवाई यांनी स्त्रियांच्या आत्मसन्मान, हक्क आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले, संचालन डॉ. सुचिता ठाकरे यांनी केले तर पंकज वंजारे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला वर्धेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.