-काही मिनिटांत आगीने घेतले विक्राळ रूप; अनेक कुटुंबे बेघर, लाखोंचे नुकसान
लोणार तालुका (वाजिद खान) : लोणार तालुक्यातील वढव गावात काल मध्यरात्री उसळलेल्या भीषण आगीने अक्षरशः तांडव माजवत संपूर्ण गावाला हादरवून सोडले. काही मिनिटांतच आगीने विक्राळ रूप धारण करत एकामागून एक घरे आपल्या कवेत घेतली आणि ६ ते ७ शेतकऱ्यांचे संसार डोळ्यादेखत जळून खाक झाले. ज्वाळांचे प्रचंड लोट, धुराचे ढग आणि आगीचा कडकडाट यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले होते.
मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली ही आग इतक्या झपाट्याने पसरली की गावकऱ्यांना काही कळायच्या आतच घरामागून घरे पेट घेत गेली. घरात झोपलेल्या कुटुंबांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव करत बाहेर पळ काढला. अनेकांनी अंगावरचे कपडेही नीट न घेता घराबाहेर धाव घेतली. महिलांचा आक्रोश, लहान मुलांचे रडणे आणि जळणाऱ्या घरांचा भीषण आवाज यामुळे हृदयद्रावक दृश्य निर्माण झाले होते. गावातील घरे एकमेकांच्या अगदी जवळ असल्याने आगीने काही क्षणांतच मोठ्या परिसराला कवेत घेतले. अनेक घरांतील धान्याचे साठे, कापूस, शेतीसाठीची अवजारे, घरगुती साहित्य, कागदपत्रे तसेच जनावरांच्या निवाऱ्यांनाही आगीने ग्रासले. वर्षानुवर्षे कष्ट करून उभा केलेला संसार काही क्षणांत राखेत परिवर्तित झाल्याने शेतकऱ्यांवर अक्षरशः आकाश कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनीही रात्री दीड वाजताच उपस्थित राहत मदतकार्याची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या समन्वयामुळे लोणार व मेहकर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे भीषण स्वरूप पाहता रिसोड येथूनही अतिरिक्त अग्निशमन गाडी पाचारण करण्यात आली.
रात्रीच्या वेळी पाण्याची कमतरता भासू नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या. दाभा येथील कृषी फिडरचा वीजपुरवठा सुरू करून पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यात आला. तसेच टँकरद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात आले. गावातील युवक, नागरिक आणि अग्निशमन दलाने एकत्र येत जीवाची पर्वा न करता आगीशी झुंज दिली. तब्बल चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटेच्या सुमारास आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक कुटुंबे पूर्णपणे बेघर झाली आहेत. काहींच्या अंगावरचे कपडे सोडले तर सर्व काही जळून गेले असून अन्नधान्य, कपडे, भांडी, कागदपत्रे यांसह जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावात सर्वत्र राखेचे ढिग, जळालेल्या भिंती आणि उद्ध्वस्त झालेले संसार पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे.
या वेळी तहसीलदार भूषण पाटील, अॅड. आकाश घोडे तसेच महसूल विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून बाधित कुटुंबांना त्वरित आर्थिक मदत, अन्नधान्य आणि पुनर्वसनासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या महसूल विभागाकडून पंचनामा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून नेमके किती घरांचे आणि किती रुपयांचे नुकसान झाले याचा अधिकृत आकडा लवकरच समोर येणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन वाठोरे यांनी घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. शासनाने या कुटुंबांना आर्थिक सहाय्याबरोबरच निवारा व पुनर्वसनाची व्यवस्था त्वरित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या भीषण आगीमुळे वढव गावासह संपूर्ण लोणार तालुक्यात शोककळा पसरली असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाकडून तातडीची मदत मिळेल, या आशेवर बाधित कुटुंबे डोळे लावून बसली आहेत.