-महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनाचा फटका नागरिकांना
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून संपावर गेल्यामुळे विविध शासकीय कामे ठप्प झाली आहेत. विशेषतः ११ वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
महाराष्ट्रातील महसूल विभागातील कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी २१ एप्रिलपासून संपावर गेले आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, यासह इतर मागण्यांसाठी त्यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. यापूर्वीही या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते आणि त्यावेळी शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारला आहे. सिंदखेडराजा तालुक्यात महसूल संघटनेचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले असून तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. परिणामी उत्पन्न दाखला, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र, जातीचा दाखला यांसारखी अत्यावश्यक कागदपत्रे मिळणे नागरिकांसाठी कठीण झाले आहे.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण पद्धतीनुसार दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ११ वीमध्ये प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. मात्र आवश्यक कागदपत्रे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा आणि कामकाज सुरळीत करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या संपात आर. आर. कहाळे, एस. डी. बंगाळे, एस. बी. रोकडे, व्ही. जे. पडघान, के. जी. इंगोले, श्रीकृष्ण शिंगणे, एस. बी. अंभोरे यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले आहेत.