-२९ एप्रिलपर्यंत विमा न मिळाल्यास आमरण उपोषण; १ मे ‘काळा दिवस’चा इशारा
लोणार (वाजिद खान) : मागील २०२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसान मान्य करून काही प्रमाणात मदत दिली असली तरी पिक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून या प्रश्नावर शेतकरी योद्धा कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांनी पिक विमा कंपन्यांना थेट इशारा दिला आहे. दिनांक २९ एप्रिल २०२६ पर्यंत लोणार, सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा न मिळाल्यास सिंदखेडराजा येथील उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास १ मे महाराष्ट्र दिन ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या आंदोलनाला बळ देण्यासाठी शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक उपाध्यक्ष रघुनाथ आघाव यांनी लोणार तहसीलदार यांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. या पत्राद्वारे बालाजी सोसे यांच्या उपोषणाला पूर्ण पाठिंबा दर्शविण्यात आला असून पिक विमा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.