-आदेशानंतरही कार्यभार न स्वीकारल्याने पेच; ग्रामस्थांच्या कामांवर परिणाम
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथील ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदाचा कार्यभार गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला होता. परंतु आधीच इतर ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळताना दमछाक होत असल्याने त्यांनी हा कार्यभार इतर कर्मचाऱ्यांकडे द्यावा, अशी मागणी पंचायत समितीकडे केली होती. मात्र गोरेगाव येथील अतिरिक्त पदाचा कार्यभार घेण्यास शेळके टाळाटाळ करीत असल्याने पेच निर्माण झाला आहे.
उद्धव गायकवाड यांना पंचायत समिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यांनी ज्या गावांमध्ये काम केले, तेथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मलकापूर पांग्रा येथे कार्यरत असताना त्यांच्याकडे जागदरी येथील अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला होता. दोन ठिकाणचा कारभार सांभाळत असतानाच त्यांच्याकडे गोरेगाव येथील पदाचाही अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. मात्र तीन ठिकाणचा कारभार सांभाळणे कठीण होत असल्याने त्यांनी ७ मार्च रोजी गटविकास अधिकारी प्रवीण बांगर यांच्याकडे गोरेगावचा कार्यभार इतरांकडे सोपविण्याची विनंती केली होती. त्यानुसार ९ एप्रिल रोजी आदेश देऊन पिंपळगाव सोनारा येथील ग्रामपंचायत अधिकारी आर. डी. शेळके यांनी हा कार्यभार स्वीकारावा, असे निर्देश देण्यात आले.
मात्र आठ दिवस उलटूनही शेळके यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेला नसल्याने गोरेगाव येथील ग्रामस्थांच्या कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन का झाले नाही, याबाबत विविध चर्चा रंगत आहेत. “उद्धव गायकवाड हे आमचे मित्र असून त्यांचा काम करण्याचा अनुभव चांगला आहे. त्यांनी काम करावे, अशी आमची इच्छा आहे; परंतु एकाच व्यक्तीवर किती कामाचा भार टाकणार, यालाही मर्यादा असते. त्यामुळे शेळके यांनी गोरेगाव येथील अतिरिक्त पदाचा कार्यभार घ्यावा,” असे मत संजय भगवान पंचाळ यांनी व्यक्त केले.