-जयंतीनिमित्त नगरपालिकेत कार्यक्रम; समता, बंधुता आणि न्याय जपण्याचे आवाहन
लोणार (वाजिद खान) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य, दीन-दलितांना जगण्याचा मूलभूत अधिकार मिळवून दिला. सामाजिक अस्पृश्यता नष्ट करून समतेचा अधिकार देत त्यांनी शोषित आणि वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. भारतीय समाजव्यवस्थेत रूजलेल्या विषमतेच्या शृंखला तोडण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि जातीभेद निर्मूलनासाठी लढा उभारल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक भूषण मापारी यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगरपालिकेत आयोजित कार्यक्रमात केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत समाजातील सर्व घटकांनी त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक भूषण मापारी यांनी पुढे सांगितले की, बाबासाहेबांनी दलित समाजाला आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. “प्रत्येक भारतीयाने प्रथम आणि शेवटी भारतीयच राहिले पाहिजे,” हा त्यांचा ठाम विचार होता. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळाल्याशिवाय खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य पूर्ण होत नाही, यावर त्यांचा भर होता. त्यामुळे दलित समाजाला सामाजिक-आर्थिक न्याय मिळून त्यांना राजकीय सत्तेतही योग्य सहभाग मिळावा, हा त्यांचा प्रमुख आग्रह होता.
शिवाय दलित समाजाचे हित जपणे हेच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकारणाचे मूलभूत सूत्र होते. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळाले असून आज देशातील लोकशाही अधिक बळकट झाली आहे. त्यांच्या विचारांचे पालन करूनच समाजात खरी समता आणि बंधुता निर्माण होऊ शकते, असेही भूषण मापारी यांनी सांगितले. या कार्यक्रमास न.प. उपाध्यक्ष आबेद खान, पंढरीभाऊ चाटे, रमजान परसुवाले, शिवसेना गटनेते मयूर गोलेचा, महिला व बालकल्याण सभापती पती संतोषभाऊ मापारी, अर्थ व नियोजन सभापती साहेबराव पवार, आरोग्य सभापती अ. उबेद अ. मुनाफ, नगरसेवक गुलाबभाई सरदार, अक्षय इंगळे, शेख जलील, भाजयुवा जिल्हा सरचिटणीस शुभम देसाई, भाजप नेते शुभम भगत, पाणीपुरवठा अभियंता महेश राठोड, कार्यालय अधीक्षक अंकुश जाधव, करनिरीक्षक कैलास नेवरे तसेच सुनील इरतकर, सुधीर काळे, संजय एंनेवार, अनंता कायंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.