चिखली (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील केळवद येथे आज (दि.13) झालेल्या एका भीषण मोटरसायकल अपघातात होमगार्ड विभागातील लिपिक आत्माराम वखरे (रा. सवणा) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सवणा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम वखरे हे आपल्या मोटरसायकलने प्रवास करत असताना केळवद जवळ त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका जोरदार होता की, वखरे यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मयत आत्माराम वखरे हे होमगार्ड विभागात लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पोलीस प्रशासन आणि होमगार्ड विभागातील कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. वखरे यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार असून, त्यांच्या जाण्याने सवणा गावावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.