– राजकीय हालचालींना वेग; गटबाजी रोखण्यासाठी ‘निष्ठावंता’च्या शोधात श्रेष्ठी!
वर्धा (प्रकाश कथले) : काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला आणि महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात काँग्रेसच्या नवीन जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. आगामी निवडणुकांचे आव्हान आणि जिल्ह्यातील विस्कळीत झालेली संघटनात्मक बांधणी लक्षात घेता, नव्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
स्वातंत्र्यलढ्यात सेवाग्राम आश्रम हे काँग्रेसच्या रणनीतीचे केंद्र होते. मात्र, गेल्या काही वर्षांत अंतर्गत गटबाजीने जिल्हयातील काँग्रेसला पोखरले आहे. ही गटबाजी मोडीत काढून जिल्हा काँग्रेस पुन्हा एकदा सामान्यांची आणि कार्यकर्त्यांची करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी कंबर कसली आहे. यावेळी जिल्हाध्यक्षाची निवड ठराविक नेत्यांच्या मर्जीनुसार न होता, ती थेट कार्यकर्त्यांच्या भावनेनुसार व्हावी, असा पवित्रा प्रदेश आणि राष्ट्रीय नेतृत्वाने घेतला आहे.
जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मनातील सुप्त भावना जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसने झारखंडच्या श्वेता सिंग यांची, तर प्रदेश काँग्रेसने माजी मंत्री आणि निष्ठावंत नेते वसंतराव पुरके यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे दोन्ही नेते सध्या जिल्हाभर फिरून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. ज्येष्ठ नेत्यांचा अनुभव आणि तरुण पिढीचा उत्साह यांचा समन्वय साधू शकणारा चेहरा पक्ष शोधत आहे.
धक्कादायक नावाचे संकेत!
सध्या जिल्हाध्यक्षपदासाठी काही प्रस्थापित नावे चर्चेत असली, तरी जाणकारांच्या मते यावेळी निवडीचा निकाल अनपेक्षित असू शकतो. केवळ नावापुरता अध्यक्ष नको, तर जिल्हाभर सक्रिय राहणारा आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे होणारी निवड अनेकांसाठी धक्कादायक, तर सामान्य कार्यकर्त्यांसाठी समाधानकारक ठरेल, असे संकेत मिळत आहेत. आगामी काळात होणारे हे संघटनात्मक बदल जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर काय परिणाम करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.