शेवगाव-पाथर्डीतही हादरे; ‘घुले पॅटर्न’ मुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता!
मुंबई/नगर (बाळासाहेब खेडकर) : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या वावटळ नाही, तर थेट राजकीय त्सुनामी आली आहे! राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणातून शरद पवार गटाचे माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी अचानक घेतलेली माघार हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, जिल्ह्याच्या राजकारणात झालेला मोठा ‘स्फोट’ मानला जात आहे. या एका निर्णयाने राहुरीसह शेवगाव आणि पाथर्डी मतदारसंघांतील सत्तेची गणिते पार उलथीपालथी झाली असून, जिल्ह्याच्या राजकारणात लवकरच मोठा ‘भूकंप’ होण्याचे संकेत मिळत आहेत.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे सुरुवातीला शड्डू ठोकून मैदानात उतरले होते. प्रसंगी ‘तुतारी’ सोडून ‘अपक्ष’ लढण्याची त्यांची तयारी होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी चक्रे फिरली आणि तनपुरेंनी मैदानातून पळ काढला. या माघारीमागे नेमकी कोणाची ‘अदृश्य शक्ती’ काम करत होती, याची चर्चा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे. भाजपच्या बड्या नेत्यांनी आणि विखे पाटील यांनी केलेली मनधरणी ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे की आतून काही ‘फिक्सिंग’ झाले आहे? असा सवाल आता सामान्य जनता विचारू लागली आहे.
घुले गटाचे ‘कमळ’ प्रेम की केवळ निधीचा बहाणा?
दुसरीकडे, शेवगाव-पाथर्डीच्या राजकारणानेही कात टाकली आहे. माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘विकासकामांसाठी निधी’ हे केवळ निमित्त असून घुले गटाची पावले ‘कमळा’कडे वळत असल्याची दाट शक्यता आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले आणि माजी आमदार नरेंद्र घुले यांनी ‘घुले कुटुंब हाच आमचा पक्ष’ अशी घोषणा देऊन पक्षनिष्ठेला हरताळ फासला आहे. या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर पक्षाची विचारसरणी बाजूला सारून स्वतःचीच ‘संस्थानं’ जपण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
जयंत पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे तनपुरे आणि घुले हे दोन्ही गट आता पक्षीय बंधने तोडून स्वतःच्या सोयीचे राजकारण करू लागले आहेत. अजित पवार गटाचा वाढता प्रभाव आणि सत्तेच्या राजकारणात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सुरू असलेली ही धडपड निष्ठावंतांच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे. राहुरीतील ही माघार आगामी मोठ्या राजकीय बदलांची नांदी ठरणार का? की नगरच्या राजकारणात नव्या युती-आघाडीचे चित्र पाहायला मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. एक मात्र नक्की, राहुरीतून सुरू झालेला हा भूकंप आगामी काळात अनेक बड्या नेत्यांना आपल्या कवेत घेतल्याशिवाय शांत होणार नाही!