-ढोल-ताशांच्या निनादात भव्य सोहळा; गावभर भक्तिमय वातावरण
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील श्री शिवाजी व्यायाम शाळा परिसरातील श्री जगदंबा देवी मंदिरात चैत्र पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी श्री हनुमान जयंती साजरी करण्यात आली, तर सायंकाळी परंपरेनुसार जगदंबा मातेची वाहन मिरवणूक काढण्यात आली.
पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार २ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. सजविलेल्या वाहनावर व्याघ्रारूढ श्री जगदंबा देवीची मूर्ती विराजमान करून गावभर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात श्री शिवाजी व्यायाम शाळेतून करण्यात आली. जय संताजी नगर, श्री पलसिद्ध स्वामी मठ, दगडी मस्जिद, गुजरी चौक, गणपती चौक, अहिल्याबाई होळकर नगर, म्हसोबा चौक या मार्गाने मिरवणूक पार पडली. मार्गक्रमणादरम्यान ठिकठिकाणी महिलांनी आपल्या घरासमोर सडा-रांगोळी काढून जगदंबा मातेची पूजा केली. पंचआरतीने देवीचे औक्षण करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. फटाक्यांची आतषबाजी आणि “जगदंबा माता की जय” च्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले.
रात्री ९ वाजता श्री शिवाजी व्यायाम शाळा येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थापक स्व. भिमराव काका इंगळे आणि स्व. रामभाऊ जैन यांच्या प्रेरणेने व्यायाम शाळेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.