-जलजीवन, पाणीटंचाई व वीजवितरणाच्या प्रश्नांवर चर्चा; काही तक्रारींचा जागेवर निपटारा
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : जनतेच्या वाढत्या समस्या प्रशासनापुढील मोठे आव्हान असले तरी त्या सोडविणे हे आपले कर्तव्य आहे. यामध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आमदार सिद्धार्थ खरात यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला. हातात हात घालून जनतेच्या समस्या सोडवू, असे सांगत कामचुकार कर्मचाऱ्यांनी आपला पर्याय निवडावा, असा इशाराही त्यांनी दिला.
मेहकर पंचायत समितीची वार्षिक आमसभा व सरपंच मेळावा स्थानिक कृषी वैभव लॉन येथे ३१ मार्च रोजी पार पडला. जलजीवन मिशन, पाणीटंचाई, वीजवितरण, घरकुल आदी विषयांवर अनेक तक्रारी समोर आल्या. आमसभेला सरपंच, ग्रामसेवक तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होती. काही तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की, स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले दिली जात असून त्याची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्मशानभूमी, बळीराजा पाणंद रस्ते आदी कामांचे प्रस्ताव सादर करण्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आमसभेत अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देशही देण्यात आले.
या वेळी अंजनी बु. येथील जलजीवन योजनेबाबत डॉ. भरत आल्हाट यांनी समस्या मांडली. रणजीत देशमुख यांनी प्रवासी निवारे, देऊळगाव साखरशा येथील जि.प. शाळेत इयत्ता पाचवी सुरू करणे, तसेच देऊळगाव साखरशा ते उमरा हद्द रस्ता सुरू करणे आणि नायगाव देशमुख रस्त्याबाबत प्रश्न उपस्थित केले. घुटी, उकळी, लोणी गवळी, विश्वी, कनका, अकोला ठाकरे आदी गावांतील सरपंच व ग्रामस्थांनीही विविध तक्रारी मांडल्या. या सर्व तक्रारींचे तातडीने निरसन करण्याचे निर्देश आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. काही तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी विविध विभागांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तसेच पुरस्कारप्राप्त गावांच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आमसभेत जलजीवनची कामे, सोलार योजना, पाणंद रस्ते, रस्ते दुरुस्ती, जलसंधारण, आरोग्य, पीएमजेएसवाय, एमएसआरडीसी, लघु सिंचन आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. एकूण २६ तक्रारी आमसभेत प्राप्त झाल्या.या वेळी नगराध्यक्ष किशोर गारोळे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रा. आशिष राहाटे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, उपविभागीय अधिकारी अजित जोगी, गटविकास अधिकारी दिनकर खरात, तहसीलदार निलेश मडके, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गजानन सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप देशमुख, युवासेना तालुकाप्रमुख अॅड. आकाश घोडे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सागर पाटील, दत्ता घनवट, विधानसभा समन्वयक संजय वडतकर, श्याम पाटील निकम, संजय सुळकर, धनराज राठोड, विशाल जवंजाळ, महेश रिंढे, आरती देशमुख, उपविभागीय अभियंता शाम मोरे, उपविभागीय अभियंता धाबे, शाखा अभियंता संजय पवार, गौतम तपासे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी मधुकर वानखेडे, वीज वितरण उपविभागीय अभियंता कळस्कर, विस्तार अधिकारी शिवाजीराव पंडागळे, शिवाजीराव गवई, सुरेश मवाळ, कृषी विस्तार अधिकारी परीहार आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक गटविकास अधिकारी दिनकर खरात यांनी केले, तर सूत्रसंचालन पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी संदीप मेटांगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समिती व महसूल विभागाने परिश्रम घेतले.