-रस्त्यांवर पाणी साचले, वाहतूक व भाविकांना गैरसोयी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी पंचक्रोशीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे भाविक व नागरिकांची तारांबळ उडाली. माऊली मंदिर परिसरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहून आले. परिसरातील धुळीचे साम्राज्य पावसाच्या पाण्यासह वाहून जात पायऱ्यांवर गाळयुक्त पाणी साचले.
या वेळी अचानक आलेल्या पावसामुळे भाविक व नागरिकांनी निवाऱ्यासाठी धावपळ केली. सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले. प्रदक्षिणा मार्गावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहन चालवताना अडचणींचा सामना करावा लागला.
श्री विठ्ठल-रुख्मिणी चौकातील पेव्हर ब्लॉक खचल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने गैरसोयींना सामोरे जावे लागले. दरम्यान, अवकाळी पावसाचा अंदाज येताच शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील कामे उरकण्याची लगबग केली. आळंदी-वडगाव रस्त्यावरील ज्ञानसागर मंगल कार्यालयाजवळील विद्युत डी.पी. जळाल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.
वाढत्या संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांना उभारी देण्यासाठी कर्जमुक्तीची गरज असल्याचे शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गाडेकर यांनी सांगितले. शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय बळीराजा सुखी होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. राज्य व केंद्र सरकारने तात्काळ शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी करून ती वर्षभर वाहती ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे. आळंदी-शिव रस्त्यावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे पावसाच्या पाण्यामुळे रहदारीस अडथळे निर्माण झाले. परिसरातील पाण्याचा निचरा व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.