– १६ बॉम्बस्फोटांच्या ई-मेलने खळबळ; महिनाभरात दुसऱ्यांदा सुरक्षा यंत्रणेला ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न
– ‘तात्काळ बाहेर पडा’च्या ई-मेलने घबराट; तासाभराच्या थरारानंतर ‘बीडीडीएस’कडून सुटकेचा निश्वास
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील मुख्य टपाल कार्यालयाला (पोस्ट ऑफिस) गुरुवारी दुपारी बॉम्बने उडवून देण्याचा धमकीवजा ई-मेल आल्याने जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये १६ आरडीएक्स बॉम्बस्फोट घडवून आणले जातील, असा खळबळजनक दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. मात्र, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) केलेल्या कसून तपासणीनंतर हा केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, महिनाभरात दुसऱ्यांदा अशा प्रकारची धमकी मिळाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२ वाजेच्या सुमारास टपाल कार्यालयाच्या अधिकृत पत्त्यावर हा ई-मेल प्राप्त झाला. यामध्ये “तात्काळ सर्वांना बाहेर काढा, दुपारी १२ वाजता बॉम्बस्फोट होतील,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. पत्राचे गांभीर्य ओळखून पोस्ट प्रशासनाने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टपाल कार्यालय रिकामे केले. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे संपूर्ण परिसराची आणि संशयास्पद वस्तूंची तपासणी करण्यात आली.
सुमारे दोन ते तीन तास चाललेल्या या शोधमोहिमेत कुठेही स्फोटक पदार्थ किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर हे धमकीचे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आणि यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, या घटनेमुळे कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
“अशा धमक्यांमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. टपाल कार्यालयाचे कामकाज आता सुरळीत सुरू झाले असून, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.”
— आशिष इंगळे, पोस्टमास्तर, बुलढाणा.
याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा ई-मेल कुठून आणि कोणी पाठवला, याचा तांत्रिक तपास पोलीस करत आहेत.