–लोणार हिरकणी महिला मंचाचा स्तुत्य पुढाकार; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोणार (वाजिद खान) : ग्रामीण व शहरी भागातील महिलांमधील कला, कौशल्ये आणि नेतृत्वगुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने लोणार येथे ‘लोणार हिरकणी महिला मंच’तर्फे ‘खेळ पैठणी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
डॉ. सौ. सुनिताताई बळीराम मापारी यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या या मंचामार्फत महिलांना स्वतःचे गुण सादर करण्याची, आत्मविश्वास वाढवण्याची आणि सामाजिक जीवनात सक्रिय सहभाग नोंदवण्याची संधी मिळत आहे. ‘खेळ पैठणी’ या उपक्रमातून महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देत त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे.
दि. १८ मार्च २०२६ रोजी महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. इंदूताई प्रकाश मापारी यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती उषाताई वामनराव फड तसेच नगराध्यक्ष सौ. मिराताई भूषण मापारी उपस्थित होत्या. पुणे येथील राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदिका सौ. प्रतिभाताई पाटील यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५००१ रुपयांची पैठणी सौ. सुनिताताई मापारी यांच्या वतीने देण्यात आली. द्वितीय पारितोषिक ४००१ रुपयांची पैठणी सौ. सुप्रिया गजानन मापारी (नगरसेविका) यांच्या वतीने, तर तृतीय पारितोषिक ३००१ रुपयांची पैठणी सौ. सुरेखा सुरेश बेदमुथा यांना प्रदान करण्यात आली. याशिवाय उत्तेजनार्थ बक्षिसे व लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला लोणार शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. ‘खेळ पैठणी’सारख्या उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सौ. सुनिता मापारी, सौ. अंजली इंगळे, डॉ. सौ. कविता मापारी, सौ. अर्चना मापारी, सौ. स्वाती मापारी, सौ. शीतल जाधव, सौ. सपना मापारी, सौ. सुप्रिया मापारी, सौ. साधना पोफळे, डॉ. सौ. वर्षा मापारी, सौ. रेणुका खोत, सौ. प्रियंका बनमेरू, सौ. प्रिती संचेती, सौ. लता ठाकूर, सौ. स्वाती मापारी, सौ. चांगुणा चव्हाण, सौ. जयश्री गायकवाड, सौ. सुरेखा बेदमुथा, सौ. वर्षा तेजनकर, सौ. मनिषा डव्हळे, सौ. सुजाता कापुरे आदींनी मोलाचे योगदान दिले.