– तलावावर पाणी पिण्यासाठी आलेला बिबट्या हाकलला; वन विभागाने तातडीने कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : मोहाडी येथील बबनराव रिंढे यांच्या शेताजवळील पाझर तलाव परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकरी व मजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार (दि. १३) रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याचे दर्शन होताच शेतात काम करणाऱ्या महिला व पुरुषांनी भीतीपोटी घराकडे धाव घेतली. या घटनेची दखल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी विलास आबा रिंढे व बबनराव रिंढे यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शिंदी परिसरातील चंदनपूर पाझर तलावाजवळही बिबट्याचा वावर आढळून आला होता. त्या ठिकाणी बिबट्याने दोन कुत्रे व एका माकडाची शिकार केल्याची घटना घडली होती. याबाबत देऊळगाव राजा येथील वन अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली होती; मात्र त्याची पुरेशी दखल घेतली गेली नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आज सकाळी ग्रामपंचायत कर्मचारी पाणीपुरवठा विहिरीवरील जळालेला मोटारपंप बसवण्यासाठी तलाव परिसरात गेले असता बिबट्या पाणी पिताना दिसला. अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी आरडाओरड करून बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला असता तो कोराडी नदीच्या दिशेने दत्ता पाटील सुरुशे यांच्या शेतातून पळून गेला.
यानंतर विलास आबा रिंढे व गावातील काही नागरिकांनी लाठ्या-काठ्या घेऊन परिसरात शोध घेत बिबट्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. या परिसरात गहू, हरभरा, मका व कांदा बियाण्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली असल्याने दाट पिकांमध्ये बिबट्याचा शोध घेणे कठीण झाले आहे. या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतात काम करणाऱ्या मजूर वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी मोहाडी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.