– मुख्याधिकारी माधव खांडेकर व लेखापाल संगीता येलमेवाड यांचा गौरव
आळंदी (अर्जुन मेदनकर) : सशस्त्र सेना ध्वज दिन २०२४–२०२५ निमित्त राबविण्यात आलेल्या निधी संकलन मोहिमेत उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव लक्ष्मणराव खांडेकर आणि लेखापाल संगीता येलमेवाड यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे यांच्या तर्फे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन मोहिमेत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी अत्यंत उत्साहाने व समर्पित भावनेने कार्य करत लष्करातील माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय व त्यांच्या कल्याणासाठी निधी संकलनाच्या राष्ट्रीय कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या अविरत प्रयत्नांची दखल घेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
सदर प्रशस्तीपत्र लेफ्टनंट कर्नल स. दै. हंगे (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा सचिव, सशस्त्र सेना ध्वज दिन निधी समिती, पुणे यांच्या स्वाक्षरीने तसेच जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष जितेंद्र डूडी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदान करण्यात आले. या सन्मानामुळे आळंदी नगरपरिषदेच्या कार्याबरोबरच शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे. लष्करातील शूर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा गौरवाचा क्षण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.