– बुलढाणा विधानसभेचे वेध? जिल्हाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर पडणार!
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) : बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ झाली. ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे जिल्हा समन्वयक आणि ‘वन बुलढाणा मिशन’चे प्रणेते, शाहू परिवाराचे सर्वेसर्वा संदीपदादा शेळके यांनी अखेर ‘मशाल’ सोडून काँग्रेसचा ‘हात’ धरला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या राजकीय भूकंपाने बुलढाण्यात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, शेळके यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागण्याचे संकेत मिळत आहेत.
छत्रपती शाहू परिवाराचे सर्वेसर्वा असलेल्या संदीपदादा शेळके यांनी लोकसभा निवडणुकीत ‘वन बुलढाणा मिशन’च्या माध्यमातून रान पेटवले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश करत जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मात्र, आज त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आपली ‘मुळांकडे ओढ’ असल्याचे स्पष्ट केले. “शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा वारसा जपण्यासाठीच हा निर्णय घेतला,” असे संदीपदादा शेळके यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेळकेंचे पक्षात स्वागत करताना त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. “संदीप शेळके हे कष्टाळू कार्यकर्ते असून त्यांनी आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढावा,” असे आदेशच सपकाळ यांनी दिले. या विधानामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शेळके हे काँग्रेसचे प्रबळ दावेदार असतील, हे आता स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात काँग्रेसला ‘बूस्टर डोस’!
संदीपदादा शेळके यांच्या रूपाने एक मोठा आर्थिक आणि सामाजिक आधार असलेला नेता गळाला लागल्याने काँग्रेस गोटात आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्याचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते राहुल बोंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनीही या प्रवेशाचे स्वागत केले आहे. शेळकेंच्या ‘शाहू मल्टीस्टेट’चे ७० हून अधिक शाखांचे जाळे आणि त्यांच्या सामाजिक कामाचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला नक्कीच होईल, असा विश्वास राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.या सोहळ्याला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आता शेळकेंच्या ‘हाता’त काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची धुरा कधी येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.