-आळंदी पंचक्रोशीतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील आळंदी शहर संविधान जागर अभियान आणि विविध सेवाभावी सामाजिक संस्था तसेच भाग्यश्री मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन विविध सामाजिक उपक्रमांनी सामाजिक बांधिलकी जोपासत उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त भाग्यश्री मंगल कार्यालयात ‘आदर्श सासू–गुणी सून’ या अनोख्या उपक्रमासह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव सन्मानपत्र, श्रीफळ, स्नेहवस्त्र आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. संविधान जागर अभियान आळंदी शहर यांच्या वतीने तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात सामाजिक बांधिलकीतून कार्यरत गुणवंत आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान उत्साहात करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान प्रमाणपत्र, श्रीफळ, स्नेहवस्त्र आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. यामध्ये नगरसेविका साक्षी कुऱ्हाडे पाटील, डी. वाय. पाटील आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल लोहकरे पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी अभिलाषा वाघमारे, मुख्याध्यापिका शोभा पवार, माजी मुख्याध्यापिका संगीता वाघमारे, महिला प्रतिनिधी सविता कुटे, कीर्ती घुंडरे पाटील, सुवर्णा काळे यांच्यासह मान्यवर महिलांचा समावेश होता. यावेळी ‘उत्सव नात्यांचा’ या उपक्रमांतर्गत आदर्श सासू आणि गुणी सून यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आळंदी शहर संविधान जागर अभियान प्रमुख अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे सचिव रामदास दाभाडे, बाबासाहेब भंडारी, कैवल्य टोपे, संकेत वाघमारे, धीरज कांबळे, विलास वाघमारे, गौतम पाटोळे, श्रुतिका मेदनकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अनिता झुजम, सुवर्णा काळे, कीर्ती घुंडरे आणि संगीता वाघमारे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात श्रींच्या प्रतिमेचे पूजन तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजन करून करण्यात आली. डी. वाय. पाटील आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल लोहकरे पाटील यांनी महिलांना आरोग्य विषयक मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर रंगपंचमीचे औचित्य साधून सर्व महिलांनी एकमेकींना गुलाल लावून ‘रंगोत्सव’ साजरा केला. तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू, प्रश्नमंजुषा आणि संवाद असे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. कवी अनिल नाटेकर यांनी सादर केलेल्या महिला दिन विशेष कविता आणि गायनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. आळंदी शहर संविधान जागर अभियान सदस्य अर्जुन मेदनकर यांनी परिश्रमपूर्वक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. प्रास्ताविक संगीता वाघमारे यांनी केले, तर अभिलाषा वाघमारे यांनी आभार मानले. शिवभक्त कैवल्य टोपे यांनी ‘शिववंदना’ सादर करत सोहळ्याची सांगता झाली.