-शिवप्रेमी मित्र मंडळ व शिव स्मारक समितीचा ‘जागर संविधानाचा’ उपक्रम
चिखली (महेंद्र हिवाळे) : साकेगाव येथे शिवप्रेमी मित्र मंडळ आणि शिव स्मारक समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी जयंतीनिमित्त ‘जागर संविधानाचा’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
जयंतीनिमित्त १८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री शिवाजी विद्यालय व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत शिवचरित्र आणि संविधानाविषयी आपले ज्ञान प्रदर्शित केले. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी महाराज स्मारक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मानवंदना पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर गावकऱ्यांना खिचडीचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी ६ वाजता महाराजांची आरती करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेच्या तालावर शिवाजी महाराज व इतर महापुरुषांच्या गीतांवर सर्व जातीधर्मातील तरुण, महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात छत्रपती, घटनापती, हिंदुसूर्य, लोकशाहीर अशा घोषणा व पोस्टर्स घेऊन युवक-युवतींनी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.
ग्रामपंचायत कार्यालयात जयंती उत्सव समितीच्या वतीने ग्रामपंचायत कमिटीच्या हस्ते सर्व महापुरुषांचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर ज्ञान परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी प्रकाश निकाळजे, शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य चौथे सर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत अधिकारी सुभाष वीर, पडघान सर तसेच गावातील सर्व समाजघटकांतील नागरिक उपस्थित होते. शेवटी आयोजकांनी उपस्थित विद्यार्थी, नागरिक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.