–गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांचे निदान
राजेंद्र घुबे (चिखली) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रतिष्ठान व देऊळगावचा राजा विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने देऊळगाव घुबे येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सदर शिबिरामध्ये सुमारे २७३ रुग्णांची बीपी, शुगर व हृदयरोग तपासणी करण्यात आली. तसेच गुडघेदुखी, कंबरदुखी, छातीत दुखणे, दमा, सतत खोकला, श्वसनाचे विकार, अपेंडिक्स, हर्निया, मुळव्याध, थायरॉईड, गाठी, मानेचे आजार तसेच चेहऱ्यावरील विविध समस्या यांची तपासणी करण्यात आली. यासोबतच सामान्य व दीर्घकालीन आजारांचे निदान करून आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची सखोल तपासणी करत योग्य सल्ला दिला. संध्याकाळी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती ढोल-ताशांच्या निनादात आणि जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. देऊळगाव घुबे नगरीतील तसेच परिसरातील युवक, लहान-थोर, महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहकुटुंब सहभागी झाले होते.
गावातील स्वामी मंदिरासमोरील चौकात गजानन महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक आरती करण्यात आली. “जय भवानी, जय शिवराय” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थित शिवभक्तांनी भगवी शिवटोपी व भगवा रुमाल परिधान केला होता. काही शालेय विद्यार्थी व नागरिकांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. उत्सव समितीच्या तरुण युवकांनी शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक कार्यक्रम पार पाडत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.