-देऊळगाव राजा कार्यालयाकडून तहसीलदारांना निवेदन; २ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा
देऊळगाव राजा (सुरेश हुसे) : राज्यातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय संप पुकारल्याने जमीन मोजणी व संबंधित प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले असून महसूल यंत्रणेतील महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत.
देऊळगाव राजा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना निवेदन सादर करून आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले.
विभागाचा ‘कणा’ असलेले भूकरमापक संपात
भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक हे जमीन मोजणी, हद्दनिर्धारण, नकाशे तयार करणे तसेच शासकीय नोंदी अद्ययावत ठेवणे यांसारखी महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मोजणीसह अनेक कामे प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांची जमीन मोजणी, फेरमोजणी, नकाशे दुरुस्ती व इतर अभिलेखीय कामांवर याचा थेट परिणाम होत आहे.
आंदोलनाचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम
कर्मचाऱ्यांनी जाहीर केलेल्या आंदोलन आराखड्यानुसार १८ फेब्रुवारी २०२६ रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून काळ्या फिती लावून काम करण्यात आले. २० फेब्रुवारीपासून मोजणी काम पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान सामूहिक रजा घेण्यात येणार असून २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास २ मार्चपासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
निवेदन सादर करताना मुख्यालय सहायक राहुल खेडकर, शिरस्तेदार हेमंत देशपांडे, वसंत सानप, निमतनदार प्रसाद पांडे, भूकरमापक रमेश शिंदे, राजेंद्र गहेराव, योगेश कांबळे, शशिकांत इंगळे, अनिकेत राठी व श्रीमती ज्योती इंगळे आदी कर्मचारी उपस्थित होते. राज्यभर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नागरिकांची जमीन मोजणी, नकाशे व इतर अभिलेखीय कामे रखडण्याची चिन्हे दिसत असून प्रशासन आणि कर्मचारी संघटनांमधील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.