-डीजेवर बंदी, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष; रमजान काळात सलोखा राखण्याचे आवाहन
सिंदखेड राजा (सुरेश हुसे) : शिवजयंती उत्सव शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस स्टेशन किनगाव राजा येथे मंगळवारी (दि. १८ फेब्रुवारी) शांतता समिती व उत्सव मंडळांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत पार पडलेल्या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीस ठाणेदार संजय मातोंडकर, पोलिस उपनिरीक्षक मोहन गिते, पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रविण गिते उपस्थित होते. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दि. १९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमध्ये कोणत्याही मंडळाने डीजेचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले. कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. सोशल मीडियावर समाजात गैरसमज, तेढ किंवा चिथावणीखोर भावना निर्माण करणारे मजकूर, छायाचित्रे किंवा व्हिडीओ प्रसारित करू नयेत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. उत्सवासाठी लावण्यात येणारे बॅनर व फलकांची योग्य देखभाल करून कार्यक्रम संपताच ते तात्काळ काढून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
कोणत्याही ठिकाणी अनधिकृत पुतळे उभारले जाणार नाहीत, यासाठी सर्व मंडळांनी दक्षता घ्यावी तसेच सर्व मिरवणुका ठरलेल्या वेळेत व शांततेत पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले. आगामी रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी सर्व समाजघटकांनी संयम, सलोखा आणि परस्पर सन्मान राखावा, असे मार्गदर्शन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. या बैठकीस सुमारे ५० ते ६० नागरिक उपस्थित होते. प्रशासन व नागरिकांच्या सहकार्यामुळे शिवजयंती उत्सव आदर्श व शांततापूर्ण वातावरणात साजरा होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला.