-रामेश्वर मंदिरात हजारोंच्या उपस्थितीत महापूजा संपन्न; आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते अभिषेक
सिंदखेड राजा (सुरेश हुसे) : सिंदखेड राजा येथील सुप्रसिद्ध रामेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त १५ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच भक्तीमय वातावरण निर्माण झाले. भगवान शंकराच्या दर्शनासाठी शहरासह तालुक्यातील आणि परिसरातील गावांमधून हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली.
पहाटे अभिषेक, रुद्राभिषेक, मंत्रोच्चार, महापूजा आणि विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले होते. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी दूध, पाणी, बेलपत्र व फुले अर्पण करून महादेवाची भक्तिभावाने पूजा केली. सकाळी ९ वाजता सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सौरभ तायडे तसेच माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे यांच्या हस्ते शिवलिंगावर अभिषेक करून महापूजा विधी पार पडला. यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे तसेच माजी आमदार तोताराम कायंदे यांनीही मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतले.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समिती व प्रशासनाच्या वतीने दर्शनासाठी रांग व्यवस्था, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच स्वयंसेवकांनीही शिस्त राखण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. महापूजेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही रामेश्वर समिती सिंदखेड राजा यांच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले. महाशिवरात्रीपासून रामेश्वर मंदिरातील यात्रेला प्रारंभ झाला असून शहरात शिस्तबद्ध पद्धतीने दुकाने, लहान मुलांसाठी पाळणे व विविध मनोरंजनाची साधने उभारण्यात आली आहेत. भक्ती आणि उत्साहाचा सुंदर संगम अनुभवायला मिळत असून दिवसभर भाविकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.