-सातगाव म्हसला येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : बुलढाणा तालुक्यातील सातगाव म्हसला येथील कलाबाई राजधरसिंग पवार महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून देऊळगाव घुबे येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शेनफडराव घुबे, बुलढाणा येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. व्ही. डी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मनोज दांडगे तसेच संत मुक्ताई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिवाण सिंग जाधव महाराज उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात संस्थाध्यक्ष दिवाण सिंग महाराज यांनी संस्था व शाळा स्थापनेमागील प्रेरणा स्पष्ट केली. स्व. भास्कररावजी शिंगणे यांच्या पुण्याईने गटसचिव पदावर कार्य करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या आदर्शातून गावातील विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक विद्यालय स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. स्व. पांडुरंगभाऊ फुंडकर तसेच डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सहकार्यामुळे संस्थेचा विकास झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. आज संस्थेचे अनेक विद्यार्थी विविध शासकीय सेवेत कार्यरत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. अतिथी म्हणून बोलताना शेनफडराव घुबे यांनी ग्रामीण भागातील शिक्षणासमोरील आव्हानांवर भाष्य केले. शहरांकडे वाढती ओढ व ट्यूशन संस्कृतीमुळे ग्रामीण शाळा अडचणीत येत असल्या तरी कलाबाई राजधरसिंग विद्यालयाने गुणवत्तेच्या बळावर आपली ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. व्ही. डी. पाटील यांनीही विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रांत उंच भरारी घ्यावी, असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शिक्षणमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला. क्रीडा क्षेत्रातही सकारात्मक बदल घडवून आणल्यामुळे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा लौकिक वाढवत असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत कमी नसल्याचे सांगत मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत त्यांनी इशारा दिला. आई-वडील व शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक असून त्यांचे संस्कार आयुष्यभर साथ देतात. त्यामुळे चुकीच्या गोष्टींपासून दूर राहून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी आवाहन केले. या प्रसंगी माजी विद्यार्थी चेतन कानडजे (हायकोर्ट वकील), पूजा कानडजे (कल्याण-डोंबिवली महानगरपालिका लिपिक), शरद सुरोशे व मंगेश गिरी (उद्योजक), नितेश दुडियार (इंजिनिअर), तेजस पठ्ठे (सीआरपीएफ) तसेच विश्वजित यंगड (बीएसएफ) यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमास सातगाव येथील पोलीस पाटील सौ. गुणवंतीबाई पालकर, माजी सरपंच त्र्यंबकराव पालकर, स्व. भास्करराव शिंगणे विद्यालयाचे अध्यक्ष शिवाजीराव पालकर, मा. भगवानराव देठे, संचालक मोहन सिंग जाधव, विठ्ठल सिंग मोरे, अविनाश पाटील, तेजराव नरवाडे यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गजानन सोनूने यांनी केले तर मुख्याध्यापक रफिक शेख यांनी आभार प्रदर्शन केले.