-ई-मेलद्वारे तक्रार; निष्पक्ष चौकशीची मागणी
इसरूळ (भिकनराव भुतेकर) : अंढेरा पोलीस स्टेशनमधील काही कर्मचारी बहुतांश वेळा शासकीय खाकी गणवेश परिधान करत नसल्याचे वारंवार दिसून येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अतिश राजे जाधव यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता झालेल्या अधिकृत गणतीदरम्यान एका पोलीस कॉन्स्टेबलने शासकीय गणवेश परिधान केलेला नव्हता. संबंधित कॉन्स्टेबल सिद्धार्थ सोनकांबळे हे त्या वेळी साध्या वेशात उपस्थित असल्याचे प्रत्यक्ष निरीक्षणात दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र ठाणेदार रुपेश शक्करगे हे पूर्ण शासकीय वर्दीत उपस्थित होते, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित वेळेचे लोकेशनमधील छायाचित्र उपलब्ध असल्याचाही दावा जाधव यांनी केला आहे. यापूर्वी ९ फेब्रुवारी रोजी चिखली तालुक्यातील काळोनावाडी फाट्यावरील आमरण उपोषणस्थळीही संबंधित कॉन्स्टेबल वर्दीत नसल्याचे दिसून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या वेळी पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी गणवेशात उपस्थित असताना संबंधित कर्मचारी साध्या वेशात दिसल्याने यामागील कारणांबाबत स्थानिक स्तरावर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ तसेच सेवा व आचरण नियमांनुसार कर्तव्यावर असताना शासकीय गणवेश परिधान करणे अनिवार्य आहे. मात्र गुप्तचर विभाग, गुन्हे अन्वेषण शाखा किंवा विशेष मोहिमांसाठी साध्या वेशाची परवानगी दिली जाऊ शकते. संबंधित कर्मचारी अधिकृत आदेशानुसार साध्या वेशात होते काय, याची पडताळणी करून आवश्यक असल्यास अंढेरा पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. या प्रकरणात कोणावर थेट आरोप करण्याचा हेतू नसून पोलीस दलातील शिस्त अबाधित राहावी आणि जनतेच्या मनातील शंका दूर व्हाव्यात, यासाठी विभागीय चौकशी करून आवश्यक त्या सूचना व कार्यवाही करावी, अशी मागणी अतिश राजे जाधव यांनी केली आहे.