-आमदार सिद्धार्थ खरात बनले ‘निक्षय मित्र’; १०३ क्षय रुग्णांचे घेतले पोषण आहारासाठी पालकत्व
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असला तरी वेळेवर योग्य उपचार आणि सकस पोषण आहार मिळाल्यास हा आजार निश्चितपणे बरा होऊ शकतो. उपचारांसोबतच पोषण आहाराचे महत्त्व लक्षात घेऊन आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघातील १०३ क्षय रुग्णांचे पोषण आहारासाठी पालकत्व स्वीकारले आहे. या उपक्रमांतर्गत ते ‘निक्षय मित्र’ बनले असून संबंधित रुग्णांना त्यांच्या माध्यमातून सकस पोषण आहार पुरविण्यात येणार आहे.
जगासह भारतात क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण लक्षणीय असून प्रमुख १० संसर्गजन्य आजारांमध्ये क्षयरोगाचाही समावेश आहे. मात्र वेळीच निदान, नियमित उपचार आणि उपचार कालावधीत पुरेसा पोषण आहार मिळाल्यास रुग्ण लवकर बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. उपचार घेत असलेल्या रुग्णांना सामाजिक आधार व पोषण आहार मिळावा, ते लवकर ठणठणीत व्हावेत आणि समाजात सन्मानाने जीवन जगावे, या उद्देशाने आमदार सिद्धार्थ खरात यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. मेहकर तालुक्यातील एकूण १०३ क्षय रुग्णांचे पोषण आहारासाठीचे पालकत्व आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्वीकारले असून आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी ते अधिकृतपणे ‘निक्षय मित्र’ बनले आहेत. यामुळे या रुग्णांना नियमितपणे सकस पोषण आहार मिळणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रौढ क्षय रुग्णांसाठी प्रतिमहिना गहू ३ किलो, डाळ १.५ किलो, गोडे तेल २५० ग्रॅम, दूध पावडर १ किलो तसेच बाल रुग्णांसाठी गहू २ किलो, डाळ १ किलो, गोडे तेल २५० ग्रॅम आणि दूध पावडर ७५० ग्रॅम असा पोषण आहार देणे अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात एकूण १६८२ क्षयरोग रुग्णांचे निदान झाले असून ते उपचार घेत आहेत. यापैकी मेहकर तालुक्यातील १०३ रुग्णांचे पोषण आहाराचे पालकत्व आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्वीकारल्याने या रुग्णांना आता नियमित आणि सकस आहार मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होण्यास मदत होणार आहे. यावेळी स्थानिक जनसंवाद कार्यालयात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय बलकार यांच्यासह अन्य उपस्थितांनी आमदार सिद्धार्थ खरात यांचा ‘मी निक्षय मित्र’ अशी फ्रेम भेट देऊन सन्मान केला.