-शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात घडलेली घटना; कंत्राटी कामगारांच्या पडताळणीवर गंभीर प्रश्न
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली असून, पाच वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप एका कंत्राटी कामगारावर करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामावर कार्यरत असलेल्या एका कंत्राटी कंपनीमार्फत काम करणारा संतोष ब्रिजपाल भोईया (वय २५) हा संशयित आरोपी २८ जानेवारी रोजी दुपारी परिसरात वावरत होता. चिमुरडी एकटी असल्याचे पाहून त्याने तिला फूस लावून झोपडीकडे नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेत चिमुरडी गंभीर जखमी झाली. घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत मलकापूर रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले व चिमुरडीची सुटका केली. पीडितेला प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र रक्तस्राव अधिक असल्याने तिला पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले असून तिची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
या घटनेमुळे संबंधित कंत्राटदार कंपनीच्या कामगार भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कंत्राटी कामगारांची पोलीस पडताळणी, ओळखपत्रे व सुरक्षाविषयक नियमांचे पालन झाले होते का, याबाबत चौकशीची मागणी केली जात आहे. केवळ काम पूर्ण करण्याच्या घाईत सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाले का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.