-खो-खो व धावण्याच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; सांघिक व वैयक्तिक खेळांत घवघवीत यश
सिंदखेड राजा (सुरेश हुसे) : सिंदखेड राजा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नारायणराव नागरे महाविद्यालय, दुसरबीड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. तालुक्यातील जवळपास सर्वच शाळांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. सांघिक व वैयक्तिक अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी सादर करत क्रीडास्पर्धांना रंगत आणली.
या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, केशव शिवणीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. खो-खो या सांघिक खेळात केशव शिवणी शाळेच्या मुलांच्या व मुलींच्या संघाने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत दुहेरी यश संपादन केले. वैयक्तिक स्पर्धांमध्येही शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १०० मीटर धावणे या स्पर्धेत कु. आरती भगवान गीते हिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून सर्वांचे लक्ष वेधले. २०० मीटर धावणे या स्पर्धेत कु. मनस्वी चव्हाण हिने द्वितीय क्रमांक, तर मुलांच्या २०० मीटर धावण्यात सर्वज्ञ विलास शेरे याने द्वितीय क्रमांक पटकावला.
यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी श्री. निकम, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. गावडे तसेच केंद्रप्रमुख श्री. सवडे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या दिमाखदार यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. एस. देशमुख तसेच श्री. संतोष डिघोळे, किशोर दंदे, अहमद शेख, सुभाष आंधळे, राजेश चाटे व शहेजाद पठाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले. तालुकास्तरावरील या यशामुळे केशव शिवणी शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.