-सामान्य कुटुंबातून नेतृत्वाकडे वाटचाल; ग्रामस्थांचा भव्य सत्कार
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : देऊळगाव मही येथील कन्या अनिता वीर यांनी पैठण नगरपालिकेच्या नगरसेवकपदी दणदणीत विजय मिळवत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल देऊळगाव मही ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे होते. त्यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेविका अनिता वीर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील मतकर, माजी सरपंच रामकिसन म्हस्के, वंदना शिंगणे, अनंथा इंगळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम पंडित, संदीप राऊत, अनिल शिंगणे, सै. वाहेद तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष समाधान शिंगणे म्हणाले,
“हा क्षण केवळ आनंदाचा नसून देऊळगाव महीसाठी अभिमानाचा आहे. या मातीत वाढलेली आपली लेक आज पैठण नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आली, ही संपूर्ण गावासाठी गौरवास्पद बाब आहे.” ते पुढे म्हणाले, “सामान्य कुटुंबातून येत, कोणताही गाजावाजा न करता प्रामाणिकपणा, जिद्द आणि जनतेशी असलेली नाळ घट्ट ठेवून अनिता वीर यांनी हे यश मिळवले आहे. ही निवड म्हणजे देऊळगाव महीच्या प्रत्येक लेकीच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे.”
मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील मतकर यांनीही अनिता वीर यांच्या नेतृत्व क्षमतेवर विश्वास व्यक्त करत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पैठण शहराच्या विकासासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण तसेच महिला व युवक सशक्तीकरणाच्या क्षेत्रात अनिता वीर प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांच्या वतीने अनिता वीर यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गजानन पंडित, दीपक पंडित व केशव पंडित यांनी परिश्रम घेतले.