-भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था असतानाही सरकारी शाळांतील आहाराचा दर्जा जपानपेक्षा मागे
दिल्ली (आवेश तिवारी) : भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. देश प्रगती करत असल्याचे मोठमोठे दावे केले जात आहेत. मात्र याच भारतातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या ताटात आजही फक्त पातळ खिचडी दिसत आहे, ही बाब समाजाला अंतर्मुख करणारी आहे.
ग्रामीण भागातील बहुतांश सरकारी शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना खिचडी दिली जाते. अनेक ठिकाणी ती खिचडी पोट भरण्यासाठीच अपुरी ठरते. भाज्या, दूध, फळे, अंडी किंवा प्रथिनयुक्त आहाराचा अभाव आजही स्पष्टपणे दिसून येतो. अनेक मुलांसाठी शाळेतील हेच एकमेव जेवण असते, तरीही त्यात पोषणमूल्यांची कमतरता कायम आहे. दुसरीकडे जपान, जो भारताच्या मागे म्हणजेच पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, तेथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संतुलित व पौष्टिक आहार दिला जातो. भात, भाज्या, मासे, दूध, सूप अशा विविध पदार्थांचा समावेश असतो. स्वच्छ टेबल, शिस्तबद्ध पद्धत आणि अन्नाबद्दल आदर शिकवला जातो.
भारत आणि जपानमधील हा फरक केवळ अर्थव्यवस्थेचा नाही, तर प्राधान्यांचा आहे. भारतात विकासाची भाषा होते, पण त्या विकासाचा फायदा अजूनही देशाच्या भविष्यासाठी असलेल्या मुलांपर्यंत पोहोचलेला दिसत नाही. देश चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनतो, हे अभिमानास्पद आहे. मात्र त्या देशातील मुलांना जर पोटभर व पोषणयुक्त अन्न मिळत नसेल, तर ही प्रगती कागदावरचीच ठरत आहे. आज गरज आहे ती घोषणा नव्हे, तर मुलांच्या ताटात बदल घडवण्याची. ही परिस्थिती बदलली नाही, तर उद्याचा भारत कसा घडणार, हा प्रश्न प्रत्येक जागरूक नागरिकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.