-सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्याला मान्यता
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर): गेल्या काही वर्षांपासून “वेदनेला फुंकर माणुसकीची” हे ब्रीदवाक्य जपत शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक तसेच पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकता फाउंडेशन संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्याचे माहिती व तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री मा. आशिष शेलार यांच्या हस्ते बांद्रा (पश्चिम), मुंबई येथील नॅशनल बुक लायब्ररी येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार विश्वभरारी फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात देण्यात आला. यावेळी विले-पार्लेचे आमदार मा. पराग अळवणी, संमेलनाध्यक्ष किरण येले, संत साहित्याच्या अभ्यासिका रेखा नार्वेकर, तसेच विश्वभरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा व संमेलनाच्या आयोजिका सौ. लता गुठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दि. २५ जानेवारी रोजी विश्वभरारी फाउंडेशनच्या वतीने एकदिवशीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, तसेच मार्गदर्शक प्रा. डॉ. भास्कर बडे यांनी संस्थेच्या वतीने हा सन्मान स्वीकारला. एकता फाउंडेशनने आजवर कोणताही भेदभाव न करता सामाजिक एकात्मतेचे नाते जोपासले असून, समाजातील दुर्लक्षित घटकांचे अश्रू पुसत त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेचा हा सन्मान करण्यात आल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी विश्वभरारी फाउंडेशनच्या संस्थापिका मा. लता गुठे व त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. एकता फाउंडेशनला मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड (मुंबई), वाल्मिक गुठे (पार्ले), रजनी ताजने (डहाणू), निर्मला शेवाळे (चेंबूर), प्रा. डॉ. जयद्रथ जाधव (लातूर), कवीवर्य प्रभाकर साळेगावकर (माजलगाव), मराठवाडा साहित्य परिषद शिरूर कासार तसेच तालुका पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकता फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासदांचे अभिनंदन केले आहे.