-इतिहास, निसर्ग, शेती आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व संगम
पुणे (अर्जुन मेदनकर) : दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यटनाच्या माध्यमातून देशाचा सांस्कृतिक, ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जपणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि भारताची जागतिक ओळख अधिक मजबूत करणे हा या दिवसामागचा प्रमुख उद्देश आहे. पर्यटन म्हणजे केवळ प्रवास नसून तो संस्कृतीचा संवाद, इतिहासाची ओळख आणि निसर्गाशी नातं निर्माण करणारा अनुभव आहे.
यावर्षी पुणे जिल्ह्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरत आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनातून २३ जानेवारी रोजी यशस्वीरीत्या पार पडलेल्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळाली आहे. ही स्पर्धा केवळ क्रीडा आयोजनापुरती मर्यादित न राहता पुण्याच्या इतिहास, संस्कृती, निसर्ग, ग्रामीण जीवनशैली, शेती आणि आधुनिक पायाभूत सुविधांचे जागतिक स्तरावर प्रभावी दर्शन घडवणारी ठरली आहे.
आजवर शिक्षण, आयटी, उद्योग व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्याला आता ‘ग्लोबल टुरिझम डेस्टिनेशन’ म्हणून नवी ओळख मिळत आहे. पुणे जिल्ह्याचा समृद्ध इतिहास—स्वराज्याची गाथा, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा, किल्ल्यांची शौर्यकथा—‘ग्रँड टूर’च्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवाच्या स्वरूपात जागतिक प्रेक्षकांसमोर पोहोचत आहे. पुरंदर, राजगड, भोर-वेल्हे परिसरातील ऐतिहासिक व नैसर्गिक स्थळे आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर ठळकपणे अधोरेखित होत असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, धरणांचे जलाशय, घाटवाटा व ग्रामीण जीवनशैली पर्यटनाला नवा आयाम देत आहेत. यासोबतच कृषी पर्यटनालाही मोठी चालना मिळणार असून पुरंदरची अंजीर, सीताफळ यांसारखी फळे पर्यटनाची ओळख ठरणार आहेत.
‘पुणे ग्रँड टूर’मुळे रस्ते, कनेक्टिव्हिटी, पर्यटन सुविधा आणि ग्रामीण पायाभूत विकासाला गती मिळणार असून याचा थेट फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला होणार आहे. होमस्टे, स्थानिक मार्गदर्शक, हस्तकला, खाद्यसंस्कृती आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा आता केवळ राज्य किंवा देशापुरता मर्यादित न राहता जागतिक पर्यटन नकाशावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘पुणे ग्रँड टूर’ ही स्पर्धा पुण्याच्या पर्यटन विकासाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून, भविष्यात जिल्ह्याला पर्यटनाच्या सुवर्णकाळात घेऊन जाणारी ठरेल, असा विश्वास जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी व्यक्त केला आहे.