-राज्यभरातील शिक्षक-अधिकाऱ्यांचा शैक्षणिक उपक्रमात सक्रीय सहभाग
बुलढाणा (बाळू वानखडे) : “वाचन, चिंतन आणि अभिव्यक्ती यांचा संगम म्हणजे पुस्तक परीक्षण असून, अशा उपक्रमांतून शिक्षक आणि विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकसित होते,” असे प्रतिपादन बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे; जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलढाणा तसेच शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धेचे उद्घाटन २३ जानेवारी रोजी गुलाबराव खरात यांच्या हस्ते झाले. हा उपक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्या प्रेरणेतून राबविण्यात आला. या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अमरावती, नागपूर, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर आणि पुणे या आठ विभागांतील शिक्षक, अधिकारी व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. एकूण ४० स्पर्धकांनी नामवंत लेखकांच्या पुस्तकांवर परीक्षण लेखन करून प्रभावी सादरीकरण केले. उद्घाटनप्रसंगी बोलताना गुलाबराव खरात यांनी सांगितले की, पुस्तक परीक्षणामुळे वाचनसंस्कृती वृद्धिंगत होतेच, शिवाय वैचारिक स्पष्टता, विश्लेषण क्षमता आणि प्रभावी मांडणीचे कौशल्य विकसित होते. शिक्षकांनी सातत्याने वाचन व लेखनाशी जोडलेले राहणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, वरिष्ठ अधिव्याख्याता समाधान डुकरे, मारोती गायकवाड, योजनाचे शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, अधिव्याख्याता गोपाल कुकडे, सुखदेवराव देठे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या परीक्षणासाठी सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे, कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, साहित्यिक किरण डोंगरदिवे, डॉ. मंजुश्री खोब्रागडे, कुणाल पैठणकर आणि विनोद देशमुख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन परेश पडोळकर यांनी मानले. प्रारंभी यशवंत अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.