– देऊळगाव घुबे येथे ‘आदर्श जीवन पुरस्कार’ वितरण सोहळा
– आरोग्य, उद्योग, सहकार, साहित्य व पत्रकारितेतील दीपस्तंभांचा गौरव
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : संघर्ष, अपार कष्ट, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जाणिवेतून विविध क्षेत्रांत उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही केवळ गौरवाची बाब नसून समाजाच्या भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. आपल्या मातीशी नाळ जपणाऱ्या अशा कर्तृत्ववान व्यक्ती नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव तथा राज्य सरकारचे मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांनी केले.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ, देऊळगाव घुबे यांच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येणाऱ्या ‘आदर्श जीवन पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा समारंभ १८ जानेवारी २०२६ रोजी जानकीदेवी विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे होते. या वेळी बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू बोंद्रे, संस्थेचे सहसचिव जनार्दन घुबे, महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. डी. एन. इंगळे, पांडुरंग भुतेकर, शेनफडराव सुरुशे, डॉ. पुरुषोत्तम देवकर, माजी कोषागार अधिकारी दिनकरराव बावसकर, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख व विद्याधर महाले पाटील यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यंदाच्या पुरस्कारासाठी पाच क्षेत्रांतील कर्तृत्ववानांची निवड करण्यात आली. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, मूळचे मेरा (बु.) येथील रहिवासी व सध्या अहिल्यानगर येथे पद्मभूषण विखे पाटील फाउंडेशनमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत डॉ. अभिजित पडघाण (मेरेकर) यांना हा पुरस्कार देण्यात आला. उद्योजकतेच्या क्षेत्रात अल्पावधीत उल्लेखनीय यश संपादन करत मुंबईतून आपल्या गावपंचक्रोशीतील ४० ते ४५ तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारे बळीराम मिसाळ यांचा सन्मान करण्यात आला. सहकार क्षेत्रात जिल्हा व राज्य पातळीवर ठसा उमटवित ६९ पतसंस्था उभारून ५०० तरुण-तरुणींना रोजगार, तसेच ३५ हजार महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या, राजर्षी शाहू पतसंस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. मालतीताई संदीप शेळके यांना गौरविण्यात आले. साहित्य क्षेत्रात आपल्या लेखणीद्वारे ग्रामीण जीवन, शेतकरी व वंचितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे रविंद्र साळवे, तसेच पत्रकारिता व सामाजिक कार्यातून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणारे, दै. देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी समाधान गाडेकर यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविकात अध्यक्ष शेनफडराव घुबे म्हणाले, “आपल्या आजूबाजूला अनेक गुणवान, कष्टाळू व सेवाभावी माणसे असतात. ती प्रसिद्धीच्या झोतात नसतात; मात्र समाजासाठी मौलिक काम करीत असतात. अशा व्यक्तींचे कार्य विद्यार्थ्यांसमोर यावे, त्यातून जीवनमूल्यांची बीजे रुजावीत, याच हेतूने हा पुरस्कार दिला जातो. ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ या तत्वावर जगणाऱ्यांचीच निवड येथे केली जाते.” पुरस्कार स्वीकारताना प्रत्येक पुरस्कारार्थी भावुक झाला होता. डॉ. अभिजित पडघाण यांनी ग्रामीण व गरजू रुग्णांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. रविंद्र साळवे यांनी साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे नमूद केले. समाधान गाडेकर यांनी गरिबीतून पत्रकारितेत आलेल्या संघर्षाची कहाणी मांडली. बळीराम मिसाळ यांनी “१२० रुपयांपासून सुरू झालेला प्रवास आज अनेक कुटुंबांचा आधार ठरला” असे सांगत विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाचा संदेश दिला. सौ. मालतीताई शेळके यांनी हा पुरस्कार संपूर्ण कुटुंब, संस्था व सहकाऱ्यांना अर्पण केला.
मुख्य अतिथी म्हणून बोलताना विद्याधर महाले पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांसमोर अशी कर्तृत्ववान माणसे उभी करणे म्हणजे समाजघडणीचे काम आहे. हा कार्यक्रम घडवून आणणारे शेनफडराव घुबे स्वतःच आदर्श जीवन पुरस्कारास पात्र आहेत.” विद्यार्थ्यांनी या जीवनप्रवासातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी सीआयएसएफसाठी निवड झालेल्या गौरव देशमुख व बीएसएफसाठी निवड झालेल्या अमोल गावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजितसिंग राजपूत यांनी केले, तर आभार प्रदर्शन उद्धव घुबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य हरिदास घुबे, अमोल घुबे व शिक्षकवर्गाने विशेष परिश्रम घेतले. पंचक्रोशीतील शेकडो नागरिक व पालक उपस्थित होते.