-शांत आंदोलनालाच शासनाची भीती; हुकूमशाही कारवाईचा जाहीर निषेध
देऊळगाव मही (सुरेश हुसे) : धनगर समाजाला घटनात्मक हक्क असलेले आरक्षण तात्काळ लागू करावे, या न्याय्य मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा देणाऱ्या मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे यांना पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट त्यांच्या राहत्या घरातून अटक केल्याने देऊळगाव मही परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईमुळे लोकशाहीचा गळा दाबण्यात आल्याचा गंभीर आरोप करत धनगर समाज बांधवांनी शासनाचा जाहीर निषेध केला आहे.
मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लाखो धनगर समाज बांधव मुंबईकडे शांततामय कूच करण्याच्या तयारीत होते. हे आंदोलन पूर्णतः कायदेशीर व लोकशाही मार्गाने होणार असताना, शासनाने भीतीपोटी दडपशाहीचा मार्ग स्वीकारत थेट अटक केल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. ही कारवाई म्हणजे सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे ज्वलंत उदाहरण असल्याचे संतप्त आरोप यावेळी करण्यात आले.
दीपक बोऱ्हाडे यांची अटक पूर्णतः असंवैधानिक असून त्यांची तात्काळ व बिनशर्त सुटका करण्यात यावी, अशी ठाम मागणी समाजबांधवांनी केली. अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस संपूर्णपणे शासनच जबाबदार राहील, असा थेट इशाराही यावेळी देण्यात आला. या निषेधावेळी मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील मतकर, देऊळगाव मही ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम पंडित, भगवान जोशी, अमोल गुरव, कैलास देढे, अभिजित शिंगणे, सतीश म्हस्के, कारभारी देढे, किशोर खंडागळे, योगेश खंडागळे, राजू बकाल, शंकर डोळझाके, अनिल वैद्य, विशाल शेळके, आदित्य चोपडे, विष्णू जोशी, ज्ञानेश्वर गायकवाड, सचिन बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.