-लोणार सरोवर येथे संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त तैलिक समाजाचा संघटन व सामाजिक सक्षमीकरणाचा संदेश
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : समाजाची संख्या कमी असल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र संघटनशक्ती दाखवून कोणत्याही निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता सिद्ध केली, तर राजकीय नेते आपोआप पायघड्या घालत समाजाकडे येतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे विभागीय सचिव रमेश आकोटकार यांनी केले.
ते लोणार सरोवर येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून लोणारच्या नगराध्यक्षा सौ. मिराताई भुषण मापारी उपस्थित होत्या. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे युवा संघटक जयेश भिसे, महिला जिल्हाध्यक्षा सुषमाताई राऊत, कार्याध्यक्ष ज्ञानदेव क्षीरसागर, युवा जिल्हाध्यक्ष तुषार काचकुरे, सचिव नंदकिशोर गायकवाड, जगनदादा व्यवहारे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर रायमुलकर, सहसचिव विजय सोनुने, प्रसिद्धी प्रमुख अशोक इंगळे, नागेश सोनुने आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा घेऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महासभेची असून, लवकरच असा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे यांनी सांगितले. यासाठी युवक संघटनांनी अधिक संघटित होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महिला वर्गाची उपस्थिती कमी असल्याबद्दल चिंता व्यक्त करत महिला जिल्हाध्यक्षा सुषमाताई राऊत म्हणाल्या की, सामाजिक कार्यात महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, यापुढे महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसली पाहिजे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मिराताई भुषण मापारी, संतोष डोंबळे, अश्विनी क्षीरसागर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मिराताई मापारी यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरखनाथ राऊत यांनी केले. आयोजन समस्त संताजी मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.