-साखरखेर्डा पोलिसांनी रात्रभर तळ ठोकला
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : चिखली–मेहकर मार्गावरील लव्हाळा परिसरात असलेल्या पाटोदा फाट्याजवळ शुक्रवारी (दि. १६ जानेवारी) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हायवेवर दगड टाकून चारचाकी वाहनांना अडवण्याचा प्रयत्न करीत रोड रॉबरी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत अनेक वाहनांच्या काचा फुटल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चोरट्यांनी पाटोदा फाट्यावर मुख्य रस्ता अडवण्यासाठी प्रवासी निवाऱ्यातील बाकडे रस्त्यावर आडवे टाकले होते. मात्र, संशय ओळखून वाहनचालकांनी गाड्या न थांबवता वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. याच वेळी प्रवासी निवाऱ्याच्या आडून रस्त्याने जाणाऱ्या सुमारे दहा ते पंधरा वाहनांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. दरम्यान, सैलानी येथे दर्शनासाठी निघालेल्या साखरखेर्डा येथील बाबुसेठ कुरेशी यांच्या वाहनाचा टायर फुटला. मात्र वाहनात क्रुझरमध्ये आठ ते दहा जण असल्याचे लक्षात येताच चोरट्यांचा रॉबरीचा प्रयत्न फसला. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्यासह दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे, पोलीस कॉन्स्टेबल विनायक परिहार तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. साखरखेर्डा, चिखली पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवली; मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
रोड रॉबरीचा प्रयत्न फसल्यानंतर आजूबाजूच्या गावांमध्ये चोरीचे प्रकार घडू शकतात, अशी शक्यता लक्षात घेऊन ठाणेदार गजानन करेवाड यांनी परिसरातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पाटोदा रस्त्यालगत सवडद येथील ग्रामविकास अधिकारी गौतम गवई यांच्या कोंबड्या, सुमारे एक क्विंटल कापूस व सोयाबीन चोरीला गेल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला असून, याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
साखरखेर्डा पोलिसांनी रात्रभर परिसरात तळ ठोकल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे जिल्ह्यात रात्री वाहनाने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिस्तप्रिय पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या पारदर्शक कारभाराला चोरट्यांनी एकप्रकारे खुले आव्हान दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी रस्त्यावर अनोळखी ठिकाणी वाहन थांबवू नये, असे आवाहन पोलिसांकडून वाहनचालकांना करण्यात आले आहे.