Breaking newsBuldanaVidharbha

बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियाला आता स्क्रब टायफसची ‘साथ’

बुलडाणा(ब्रेकिंग महाराष्ट्र):-पाऊस पडला की, स्क्रब टायफसचे रुग्ण दिसायला लागतात. जिल्ह्यात एकही रुग्ण नव्हता, आता मात्र ‘ओरिएन्शिया सुसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणाऱ्या गंभीर आजाराने जिल्ह्यात स्क्रब टायफसचे तब्बल 9 संशयित रुग्ण आढळून आले.मलेरियाचे 13 तर डेंग्यू व चिकनगुनियांचे 3 रुग्ण उपचार घेत असून आता या साथरोगांना स्क्रब टायपासची देखील साथ मिळत तत्पूर्वीच स्वाइन फ्लू ने एकाचा बळी घेतला.परिणामी आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. 

 

कोविड आजाराचे रुग्ण सध्या कमी आढळत आहेत. मात्र इतर आजारांनी आता डोके वर काढणे सुरु झाले आहे. शेतकरी तर स्क्रब टायफस या आजारामुळे आता एका नव्या चिंतेत सापडला आहे. शहरातील इकबाल चौकातील एक युवक स्वाइन फ्लूच्या आजाराने मरण पावला आहे. असे असताना बुलडाणा शहरात दोन्ही आजाराची तपासणी करणारे केंद्र स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर उघडण्यात आले असून त्यामुळे निदान लवकर होण्याचा दिलासा रुग्णाला मिळला आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सध्या 15 इतकी आहे. दररोज किमान एक किंवा दोन रुग्ण आढळून येत आहेत. मात्र उपचाराने ते बरे होत आहेत. कोरोनाचा विषाणू कमी होत असताना स्वाइन फ्ल्यूने बुलडाण्यातील इक्बाल नगरात एका 35 वर्षीय रुग्णाचा बळी घेतला. आणखी एक रुग्ण जिल्ह्यात आढळून आला आहे. लोणार शहरातील हा रुग्ण असल्याने लोणारमध्ये ही चिंतेचे वातावरण आहे. हा आजार डुकरांमुळे होत असल्याचा निष्कर्ष समोर येतोय. दरम्यान खामगाव तालुक्यातील 9 रुग्णांना स्क्रब टायफस आजाराने ग्रासल्याची माहिती आहे. साथरोग नियंत्रण अधिकारी या रुग्णांना संशयित रुग्ण म्हणून संबोधत आहे.ट्रॉम्बिक्युलीड माइटचे लारव्हे,ज्याला चिगर म्हणतात ते चावल्यामुळे ‘ओरिएन्टा सुसुगामुशी’ हे जंतू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. जिथे झाडीझुडूप किंवा गवत असते त्यावर हे चिगर असतात. गवत कापताना गवतावर बसल्याने किंवा ट्रेकिंग करताना ते माणसाला चावतात. मानव ही आकस्मिक होस्ट आहे. हे चिगर माइट उंदरांना चावतात आणि तिथून रोग पसरतो. मोठी माइट चावत नाही आणि ती जमिनीवरच असते. चिगर लारव्हे अतिशय सूक्ष्म आकाराचे असतात. साधारण 0.2 ते 0.4 मिलीमीटर आकाराचे. त्यामुळे ते डोळ्यांना दिसत नाहीत. ते चावण्याच्या ठिकाणी दुखत पण नाही. त्यामुळे काही चावल्याचं भान राहत नाही.चिगर चावल्यानंतर 5 ते 20 दिवसांनी रोगाची लक्षणं दिसायला लागतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणं, मळमळ, ओकाऱ्या आणि इतर तापाच्या रोगासारखी लक्षण असतात. त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये मलेरिया, विषमज्वर किंवा डेंग्यू असण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्या ठिकाणी चिगर चावतो त्या ठिकाणी एक व्रण असतो, ज्याला इशर म्हणतात. हा दिसला तर रोगनिदान नक्की झालं असं समजण्यात येते. परंतु 40 टक्के रुग्णांमध्ये हा इशर दिसत नाही. कपड्याने झाकलेल्या भागात तो असला तर दिसणं आणखीच कठीण होते.या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. लवकर निदान, लोकांचे जनजागरण, उंदरांवर नियंत्रण मिळवले तर स्क्रब टायफस आटोक्यात येऊ शकतो. हा आजार उंदरामुळे होतो. उंदराच्या रक्तावर या आजाराचे किटाणू वाढतात. हे उंदीर उंच गवत, झाडा झुडपात जातात तेव्हा हे जिवाणू मानवाच्या संपर्कात आल्यानंतर हा आजार होतो. शेतकऱ्यांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. कारण शेतात उंदीर बिळातृून बाहेर येतात. शहरी भागात गवत वाढण्याचे प्रमाण तुरळकच आहे. या आजाराचे 9 रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. हा आजार मात्र उपचाराने बरा होतो.

 

 

 

स्वाइन फ्लू व स्क्रब टायफसची लस उपलब्ध

स्वाइन फ्लू व स्क्रब टायफस या दोन्ही आजाराची लस आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे. लक्षणे बहुतांश या आजाराची व कोरोनाची सारखीच आहेत. थोडा फार बदल आहे. या आजारावर त्वरीत उपचार होत असला तरी लोणार येथे आढळून आलेल्या स्वाइन फ्लू या आजाराच्या रुग्णावर अकोला येथे उपचार सुरु आहेत. आता टायफेड हा आजारही बळावत चालला आहे. पावसाची संततधार असल्याने अनेकजण पावसात भिजल्यानेही आजार बळावले आहेत.

 

 

 

स्क्रब टायफसची लक्षणे-

ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कोरडा खोकला, न्युमोनिया सदृष्य आजार अशी लक्षणे आहे. कीटक चावल्याने खाज येते व अंगावर चट्टे येतात. दंश झालेल्या ठिकाणी जखम होऊन खपली येते. रोगाची लक्षण आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

 

यंत्रणा अलर्ट

विविध आजार डोके वर काढत आहेत.सध्या गवताचे प्रमाण वाढले. बहुतांश प्रमाणात शेतकरी शेतात काम करत असल्याने या गवतातील किटकांमधून हा आजार होत आहे. सध्या स्क्रब टायफसचे जिल्ह्यात 9 संशयित रुग्ण आढळले असून स्वाइन फ्ल्यूपेक्षा या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र यावर आपल्या जिल्ह्यात उपचार होत आहेत. औषधोपचाराने रुग्ण बरा होतो. विशेष म्हणजे कोणत्याही लॅबवर या आजाराचे निदान तपासणी नंतर होते. सध्या ग्रामपंचायत आणि नगरपालिका प्रशासनाला औषध फवारणीचे निर्देश देण्यात आले आहेत.

-प्रकाश तांगडे पाटील, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी, बुलडाणा

 

 

 

साथरोग रोखण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालय प्रयत्नरत आहे. एक जानेवारी ते 18 ऑगस्ट पर्यंत बावन प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर नागरी आरोग्य केंद्रावर 2,78,771 रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी 13 रुग्ण मलेरियाचे आढळून आले. तसेच डेंग्यू व चिकनगुनियांचे 196 रक्त नमुने घेण्यात आले. तपासणीअंती 3 रुग्ण दूषित आढळून आले आहे.

– शिवराजसिंग चौहान

जिल्हा हिवताप अधिकारी बुलडाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!