राजेंद्र काळे
संतनगरी शेगाव :
‘आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने,
शब्दाचीच शस्त्रे यत्ने करु..
शब्दची अमुच्या जीवाचे जीवन,
शब्द वाटू धन ऐकमेका!’
जगदगुरु तुकोबारायांच्या शब्दप्रधान अभंगाप्रमाणेच पत्रकार हा शब्दातून प्रवाहीत होणारा समाजाचा घटक असतो, राज्यव्यवस्थेत त्याला लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हटल्या जातो. बातमी, हा पत्रकारांचा श्वास असतो.. व त्याच बातम्यांवर समाजाचा विश्वास असतो. म्हणून पेपरात काय छापून आलयं? याची आतुरता प्रत्येक पहाटे जनामनाला असतेच.. पण त्याच बातम्यांसाठी पत्रकार रात्रीचा दिवस करुनही झटलेला असतो. इंग्रजांविरुध्द स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटविण्याचे कामही पत्रकारांनीच केले, मात्र तेंव्हापासूनही पत्रकार हा उपेक्षीत घटकच होता.. आजही आहे. याच पत्रकारांचे एखादे संघटन असावे, या उदात्त हेतूने ३ डिसेंबर १९३९ रोजी मुंबईत मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली. पहिल्याच वर्षी मुंबईत परिषदेचं अधिवेशन भा.वि. वरेरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालं, अन् द्वैवार्षिक अधिवेशनाचा सुरु झालेला तो शब्दप्रवास ४१व्या अधिवेशनात संतनगरी शेगावपर्यंत येवून पोहचला. या अधिवेशनाचे अध्यक्ष एस.एम.देशमुख अन् शेगाव संस्थानच्या परिसरात होणाऱ्या अधिवेशनाचे उद्घाटक होते शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे.
श्री गजानन- श्री साई असा हा भक्तीचा दुग्धशर्करा योग!
मराठी पत्रकार परिषदेचे ४१वे द्वैवार्षिक अधिवेशन, अन् तेही प्रथमच राष्ट्रीय अधिवेशन म्हणून जाहीर झालेलं. महाराष्ट्र, विदर्भ अन् वऱ्हाड ही कृषीप्रधान प्रांत. महिन्याभरापासून पावसानं दडी मारल्यामुळं त्यावेळी अधिवेशनाच्या तयारीवरही चिंतेचं ढग होते. पण अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला जस-जसे पत्रकार संतनगरीत दाखल होवू लागले, तस-तसा जणु त्यांच्या आगमनासाठी वरुण राजा बरसायला लागला. १९ ऑगस्ट २०१७ ही अधिवेशनाची पहाट तर धुवाँधार पाऊस घेवूनच उजाडली, त्यामुळे तनाने अन् मनानेही चिंब होवून पत्रकार श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधिवेशनस्थळी दाखल होवू लागले. प्रवेशद्वारावर आलेल्या पत्रकार पाहुण्यांचे स्वागत गजानन महाराज इंग्लिश स्कुलच्या चिमुकल्यांनी बँडधून वाजवून केले, त्याच धूनच्या भक्तीमय धुंदीत पत्रकार अधिवेशनाच्या इतिहासात प्रथमच निघाली पत्रदिंडी. सजविलेल्या पालखीत दर्पण, मुकनायक, केसरीपासून आताच्या वृत्तपत्रांपर्यंत सर्व वृत्तपत्र ठेवण्यात आली होती. वृत्तपत्र पुजनानंतर ही पालखी दिंडीच्या माध्यमातून सभागृहस्थळी पोहचली, पालखी समारोपापर्यंतही व्यासपीठावरच विराजमान होती.. शब्दाला लाभलेल्या भक्तीमय झालरीचे ते दृष्य होते.
पत्रकारांच्या भरगच्च उपस्थितीत सुरु झाला, उद्घाटन सोहळा. श्रींच्या प्रतिमेपुढचा दिवा प्रज्वलीत झाला व अख्ख्या सभागृहात ज्ञानप्रकाश पसरला. अधिवेशन आयोजनामागची भूमिका प्रास्ताविकातून मुख्य संयोजक राजेंद्र काळे यांनी विषद करुन, आलेला हा क्षण बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या इतिहासातील सुवर्णक्षण असल्याचे सांगितले. आ.डॉ.संजय कुटे यांनी सर्वांचे स्वागत केले. शेगाव आराखड्याला मुर्तरुप देणारे वृत्त प्रकाशीत केल्याबद्दल अरुण जैन तर परिषदेशी तिसरी पिढी एकनिष्ठ असल्याबद्दल नरसिंह चिवटे करमाळा यांचे विशेष सत्कार झालेत. अनेक सत्कार होत होते, प्रत्येकाच्या ठायी भावना प्रामुख्याने होती,
शब्दची अमुच्या जीवाचे जीवन!
‘लेखणीधरल्या हातांना, अशीच उभारी पाहिजे..
जास्त नाही मनात, थोडीतरी खुमारी पाहिजे!!’
लेखणीधरल्या हातांना अशीच उभारी देण्यांच काम उद्घाटन सोहळ्यात दिमाखदार पध्दतीनं सुरु होतं. स्वागताध्यक्ष म्हणून पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी राज्यभरातून आलेल्या पत्रकारांचं स्वागत करतांनाच पत्रकार संरक्षण कायद्यानंतर ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शनसाठीही सरकार अनुकूल आहे, असं सुतोवाच करुन एकप्रकारे उद्घाटन सोहळ्यातच अधिवेशनाची फलशृती करुन टाकली. ना.सदाभाऊ खोत, आ.विनायकराव मेटे अन् ना.रविकांत तुपकर यांनी पत्रकारीतेवर केलेले भाष्य टाळ्या मिळवून गेले. डॉ.सुरेश हावरे यांनी मंदीर व्यवस्थापनावर पत्रकारांना अंतर्मुख करतांना सर्व पदं हिरावल्या जावू शकतात, पण पत्रकार हे पद अबाधीत असल्याचं ते म्हणाले. अध्यक्षीय मनोगतात एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांच्या अडी-अडचणी अन् त्यावरील उपाय व सरकारकडून असलेली अपेक्षा व होणारी उपेक्षा, यावर सविस्तर प्रकाश टाकला. आ.श्रीकांत देशपांडें सह अनेक वक्तेही भरभरुन बोलले. न भुतो: आतापर्यंतच्या सर्व अधिवेशनातील नियोजनबध्द व सर्वात यशस्वी अधिवेशन, अशी जाहीर पावतीच यावेळी अध्यक्षांनी देवून मारली ती..
बुलडाणा जिल्हा पत्रकार संघावर कौतूकाची थाप!
उद्घाटन सोहळा हा कोणत्याही कार्यक्रमाचा माईलस्टोन असतो, मग पुढचे सत्र चालत राहतात. संपादक ही व्यवस्था केवळ नावापुरतीच शिल्लक आहे काय?’ या विषयावरचा परिसंवाद व ‘ग्रामीण पत्रकारीता : दशा आणि दिशा’ या ज्वलंत विषयावरचे चर्चासत्र प्रमुख वक्त्यांच्या अभ्यासपुर्ण मुद्यांनी एकूणच पत्रकारीतेला अभ्यास करायला लावणारे ठरले. मुंबईतील पत्रकारांनी सादर केलेल्या ‘न्यूजलेस कविता’ कार्यक्रमाने पत्रकारांची दु:ख, वेदना, वाहिन्यातील गंमती-जंमती आणि एकूणच पत्रकारांचे भावविश्व काव्यविश्वातून उलगडून दाखविले. दिवसभराच्या वैचारीक प्रबोधनानंतर पहिल्या दिवसाचा शेवट अरविंद भोंडे व अॅड.अनंत खेळकर यांच्या काव्यांनी पत्रकारांना पोटभर हसवून गेला.. रविवार २० ऑगस्ट २०१७ चा आरंभ पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यापासून सुरु झाला. तणावमुक्तीसाठी आयुर्वेद, या विषयावर ‘निमा’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.विनायक टेंभुर्णीकर यांनी संवाद साधून आरोग्यविषयक अनेक शंकांचे निरसन केले. नंतर सरळ-सरळ वास्तववादी पत्रकारीता करणारे राजेश राजोरे यांची झाली प्रकट मुलाखत, त्यांचे पत्रकारतेतील लेखनविश्व उलगडवून घेतले ते मुक्त पत्रकार नरेंद्र लांजेवार व सिध्देश्वर पवार यांनी.
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मिडीया कानाडोळा करतोय का?’ या विषयावर निलमताई गोऱ्हे, प्रकाशभाऊ पोहरे, विजय जावंधीया, निशिकांत भालेराव व गंगाभीषण थावरे यांनी मांडलेल्या सडेतोड भूमिका लक्षवेधी ठरल्या. पत्रकार संरक्षण कायद्यावर अॅड.जयेश वाणी बोलले. खा.प्रतापराव जाधव व आ.बच्चू कडू यांनीही संवाद साधला. तत्कालीन आमदार हर्षवर्धन सपकाळ, आ. डॉ. संजय रायमुलकर, आ. आकाशदादा फुंडकरांचीही उपस्थिती लाभली.
ना.डॉ.रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत झालेला समारोप सोहळा हा अधिवेशनाचा सार ठरणारा होता. निरोपाच्या समयी कौतुकाचे शब्द येत होते, सकलांच्या अधरावरी..
अधिवेशनाचा वेलू गेला होता, गगनावरी!
अशी घडली, संतनगरीत पत्रकारांची मांदीयाळी!!