-भक्तीमय वातावरणात धार्मिक सोहळ्याची परंपरा
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी पालखी मार्गावरील वडमुखवाडी परिसरात असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री विठ्ठल–रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन तसेच श्री संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, गाथा भजन व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर व खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
दि. १४ जानेवारी ते २३ जानेवारी २०२५ या कालावधीत मंदिर परिसरात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या भक्तिमय सोहळ्याचा प्रारंभ मंगळवार, दि. १४ जानेवारी रोजी होणार आहे. प्रारंभी विना पूजन, कलश पूजन व ग्रंथ पूजनाचा विधी शांतीब्रह्म ह.भ.प. मारोती महाराज कुरेकर व डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
सप्ताह काळात श्रींची महापूजा, काकड आरती, श्री ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, महिला भजनी मंडळांची भजन सेवा, हरिपाठ, हरी कीर्तन व हरी जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात पार पडणार आहेत. दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. एकादशीच्या दिवशी ह.भ.प. तुकाराम महाराज ताजणे यांचे कीर्तन होणार आहे.
सप्ताहादरम्यान विश्वनाथ महाराज मस्के, संतोष महाराज काळोखे, नारायण महाराज काळे, अच्युत महाराज डोंगरे, रोहित महाराज पांचाळ, भीमराव महाराज शास्त्री, हरिदास महाराज शास्त्री व ज्ञानेश्वर माऊली करंजीकर यांच्या कीर्तन सेवेमुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह.भ.प. गोविंद महाराज गोरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून तत्पूर्वी दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सप्ताह काळात दररोज पहाटे महापूजा व काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, महिला भजनी मंडळांची भजन सेवा, हरिपाठ, कीर्तन, हरीजागर व महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. या धार्मिक सोहळ्याचा लाभ भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर व खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांनी केले आहे.